ठाकरे सरकारकडून मुंबईला ‘टोलमुक्ती’ नाही, एकनाथ शिंदेंच्या पत्रावरून स्पष्ट

Thackeray Government - Toll - Eknath Shinde

ठाणे : इतर जिल्ह्यांमधून मुंबईत (Mumbai) येणाऱ्या वाहनधारकांना टोल भरावा लागेल हे आता स्पष्ट झाले आहे. मुंबई, ठाणे (Thane) आणि नवी मुंबईच्या (Navi Mumbai) वेशीवरील पाच टोलनाके बंद करण्याची मागणी ठाकरे सरकारने (Thackeray Government) पुन्हा एकदा फेटाळली आहे. टोलनाके रद्द करायचे झाल्यास संबंधित ठेकेदाराला कोटय़वधीची भरपाई द्यावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा राज्य सरकारला ते शक्य नाही, असे पत्र राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे शहर मतदारसंघातील भाजपचे (BJP) आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांना पाठवले आहे.

मागील पाच वर्षांपासून सत्तेत असताना नेमके हेच कारण देऊन टोलमाफीच्या मुद्दय़ाला बगल देणाऱ्या भाजपने आता या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेची (Shiv Sena) कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरांच्या वेशीवर पाच टोलनाके आहेत. त्यामध्ये आनंदनगर, मॉडेला चेक नाका, दहिसर, ऐरोली आणि वाशी या टोलनाक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी टोल वसुलीसाठी वाहने थांबविली जात असल्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागून कोंडी होते. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतुकीवर होतो. तसेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई ही तिन्ही शहरे एकमेकांना जोडलेली असली तरी या शहरांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना टोल भरावा लागतो. त्यामुळे टोलमाफी देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत असून या टोलमाफीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडूनही आंदोलने करण्यात आली आहे. गेली पाच वर्षे राज्यात भाजपसह सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेनेही या मुद्दय़ावर आक्रमक पवित्रा घेतला होता.

सध्याचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास खात्यांचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्दयावरुन रान पेटविले होते. मात्र त्या वेळी भाजपप्रणीत राज्य सरकारने आर्थिक कारण पुढे करत टोलमाफीचा मुद्दा टोलावून लावला होता. आता भाजपनेच हा मुद्दा हाती घेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची कोंडी करण्याची खेळी केली आहे. ठाणे शहर मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुंबई प्रवेशद्वार टोलमुक्त करण्याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याबाबत शिंदे यांनी त्यांना नुकतेच एक पत्र पाठवून टोलमुक्त करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.मुंबईसह मुंबई-पुणे महामार्गावरील टोलनाके बंद केल्यास तब्बल १३ हजार ३७९ कोटी ७६ लाख रुपये ठेकेदारांना मोजावे लागतील, तर या टोलनाक्यांवर हलकी वाहने, एसटीला टोलमाफी दिल्यास ६ हजार ८६३ कोटी ५८ लाखांचा भुर्दंड शासनाला सोसावा लागेल. त्यामुळे मुंबई प्रवेशद्वार टोलमुक्त होऊ शकत नाही, असे नगरविकास मंत्री

एकनाथ शिंदे यांनी भाजप आमदार संजय केळकर यांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. मुंबई शहर व परिसरातील होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी ५५ उड्डाणपूल व अनुषंगिक बांधकामे ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खासगीकरणातून केली आहेत. या सर्व उडाणपुलांची ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत देखभाल व दुरुस्ती करणे, ठड्डाणपुलांचा बांधकाम खर्च, कर्जावरील व्याज यासह अन्य झालेला खर्च अद्याप वसूल झालेला नाही. मुंबईतील पाच पथकर नाक्यांचे सिक्युरिटायझेशन करणे या प्रकल्पांतर्गत मुलुंड( पूर्व द्रुतगती मार्ग) मुलुंड( एलबीएस मार्ग), याशी, ऐरोली, दहिसर या टोलनाक्यांवर टोलवसुली केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER