इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी नाकारली, डब्बेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार

Mumbai Dabbewalas complaint to Raj Thackeray

मुंबई : कोरोना (Corona virus) साथीच्या आजारामुळे मार्च पासून बंद असलेली मुंबईची जीवन वाहिनी मागील चार महिने पुर्णपणे बंदच होती. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी लोकल सेवा सुरू केली. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणासाठीही रेल्वे सेवा सुरु नसल्याने मुंबईतील डबेवाल्यांची मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करा यामागणीसाठी मनसेने (MNS) काही दिवसांपूर्वी सविनय कायदेभंग आंदोलन केले. या आंदोलनाला मुंबई डबेवाला संघटनेने देखील पाठिंबा दिला. यानंतर डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

मुंबईतल्या चाकरमान्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जेवणाचा टिफिन वेळे पोहोचविणाऱ्या या डब्बेवाल्यांची सेवा सध्या बंद आहे. या सेवेवरच शेकडो डब्बेवाले आपली उपजिविका चालवत असतात. सेवाच बंद असल्याने घर चालवायचं कसं असा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. असे सगळे प्रश्न घेऊन त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना व्यथा सांगितली. लोकलमधून अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांबरोबरच डब्बेवाल्यांनाही प्रवासाची परवानगी मिळावी अशी त्यांची मुख्य मागणी होती.

राज्यातील असंघटित कामगार हा बहुतांशी परप्रांतीय आहे. तरीदेखील महाविकास आघाडीने त्यांना ५ हजार रुपये मदत केली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो, परंतु मुंबईत राहणारे डबेवाले हे भूमिपुत्र असून त्यांच्याही खात्यावर ५ हजार रुपये जमा करण्यात यावेत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली होती. विशेष म्हणजे यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा देखील झाली. परंतु अद्याप निर्णय न झाल्याने कोणताही लाभ डबेवाल्यांना मिळाला नाही, असं मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आम्हा डबेवाल्यांना शाळांमध्ये येण्याची मनाई केलेली आहे. डबेवाल्यांमुळे शाळांमध्ये करोनाचा संसर्ग वाढणार असल्याचे शाळांचे म्हणणे आहे. मात्र ते आम्हाला ते पटलेले नाही. याबाबत देखील आम्ही राज ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. त्यावर राज ठाकरेंनी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू, असे आश्वासन दिले असल्याची माहिती संघटनेकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER