भावाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात गोंधळ करून डॉक्टरला मारहाण करणाऱ्या आरोपीला जामीन

Court

मुंबई : केईएम रुग्णालयात भावाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात गोंधळ घालून महिला डॉक्टरला मारहाण करणारा आरोपी नवीन परमार याला गुरुवारी सत्र न्यायालयाने जामीन दिला. जामीन मंजूर करताना न्यायाधीश यू. एम. पदवाड म्हणाले की, आरोपीची कृती ही भावाच्या मृत्यूमुळे बसलेल्या धक्क्याची प्रतिक्रिया होती. पूर्वनियोजित हल्ला नव्हता. डॉक्टरवर हल्ला करणे हा आरोपीचा अपराध गंभीर आहे. पण हे कारण आरोपीला अटकेत ठेवण्यासाठी न्यायसंगत नाही.

याबाबतची हकिकत अशी की, नवीनचा भाऊ जतीन हा तापाने आजारी होता. त्याला उपचारासाठी ५ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याआधी त्याच्यावर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. केईएममध्ये दाखल केले त्यावेळी त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ९ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती.

जतीनच्या निधनाची बातमी ऐकून नवीनने रुग्णालयात गोंघळ घातला. डॉक्टरांच्या अंगावर धावून गेला. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागला. नवीन आणि त्याच्या सुमारे २० नातेवाइकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केली.

जतीनचे शरीर गरम आहे म्हणून तो जिवंत आहे, असे म्हणून जतीनचा मृत्यू दाखवणारा ईसीजी फाडून टाकला आणि जतीनला व्हेंटिलेटरवर ठेवा, अशी मागणी केली. केईएमच्या प्रशासनाने नवीनविरुद्ध पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नवीन आणि इतर चार आरोपींना अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER