धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray-Dharavi Corona

मुंबई : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरुद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतुक करताना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. “हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश आहे. धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी आहे.” असेही ते म्हणाले.

देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . त्यातही मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली. आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीनं कोरोनाविरोधातील लढा यशस्वी करून दाखवला आहे. कोरोना रुग्णांचा सर्वाधिक आकडा आढळून आलेल्या धारावीत प्रशासनाच्या उपाययोजनांचा परिणाम म्हणून कोरोना संक्रमणात आश्चर्यकारकरीत्या घट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आता याची दखल घेण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र आले असून या पत्रात ठाकरेंचे कौतुक करण्यात आले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस म्हणाले की, कोरोनाचे संक्रमण वेगाने झाल्यावर सरकारने त्यावर नियंत्रण मिळवल्याचे धारावी हे उत्तम उदाहरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER