दिवाळीआधी मुंबई काँग्रेसला मिळू शकतो नवा अध्यक्ष

- सुरेश शेट्टी, अमरजिसिंग मनहास शर्यतीत

Congress Flags

मुंबई :- काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेशाध्यक्षांसोबतच मुंबईचे काँग्रेस अध्यक्षही बदलण्याची शक्यता आहे. ‘म्हाडा’चे माजी अध्यक्ष अमरजितसिंग मनहास आणि माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी (Suresh Shetty) या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.

दिवाळीपूर्वीच मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. मुंबई महापालिका (BMC) निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस मुंबईत पक्षाची पुनर्बांधणी करणार आहे.

अमरजितसिंग मनहास, सुरेश शेट्टी, भाई जगताप, मधू चव्हाण, चरणसिंह सप्रा यांची नावे चर्चेत आहेत. विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी पुन्हा मराठी चेहरा मिळणार, की अमराठी याबाबत राजकीय निरीक्षकांना उत्सुकता आहे.

या नावांची चर्चा

सुरेश शेट्टी : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार. शेट्टी हे आघाडी सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री आहेत. ते विद्यार्थी चळवळीतून आलेले आहेत.

अमरजितसिंह मनहास : मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपाध्यक्ष आहेत.

भाई जगताप : विधान परिषद आमदार. त्यांच्या आमदारकीची ही दुसरी पाळी आहे. ते विधानसभेवरही निवडून गेले होते.

मधू चव्हाण : मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष. भायखळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार. मिलिंद देवरा गटातील नेते म्हणून ओळख.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली होती.

प्रदेशाध्यक्षपदाबाबतही चर्चा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदातही बदल होण्याची शक्यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी महाविकास आघाडी सरकारमधील दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना संधी मिळू शकते.

याशिवाय पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचीही नावे शर्यतीत होती. मात्र सुनील केदार यांच्या खांद्यावर पक्षाचे दिग्गज नेते राहुल गांधी जबाबदारी टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जानेवारी महिन्यात निवड होण्याचे संकेत आहेत. राहुल गांधी त्यांच्या नवीन टीममध्ये युवकांना प्राध्यान्य देणार आहेत.

ही बातमी पण वाचा : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेसकडून नावे निश्चित, मात्र शिवसेनेत मतभेद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER