मुंबई बत्तीगुलप्रकरण : सायबर सेलचे ३ गंभीर खुलासे!

Anil Deshmukh

मुंबई : मुंबईत (Mumbai) झालेल्या बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याच्या न्यूयॉर्क टाईम्स आणि रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अ‍ॅनालिसीस कंपनीच्या दाव्यांवर सायबर सेलने गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे अहवाल सोपवला आहे. यामध्ये सायबर सेलने ३ मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. मुंबईतल्या MSEB च्या सर्व्हरमध्ये हॅकिंगचे प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तवली आहे. हा पूर्ण अहवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या आधारावर सविस्तर तपास आणि चौकशी होणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

अहवालामधील ३ मुख्य मुद्दे-
१) १४ ट्रोजन हॉर्सेस एमएसईबी मुंबईच्या प्रणालीमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा पुरावा मिळाला आहे.
२) ८ जीबी डाटा बाहेरच्या सर्व्हरमधून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर झालेला असू शकतो.
३) ब्लॅकलिस्टेड आयपी अ‍ॅड्रेसवरून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न झालेला असू शकतो.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारत आणि चीनमधले द्विपक्षीय संबंध ताणले गेले. या दोन्ही देशांच्या सीमारेषेवर असलेल्या गलवान प्रांतामध्ये भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट झाली होती. मुंबईत १२ ऑक्टोबरला दिवसभर वीज नव्हती. काही भागांमध्ये तर दुसऱ्या दिवशी वीज आली. ठाणे जिल्ह्यातल्या पडघा लोड डिस्पॅच सेंटरमध्ये ट्रिपिंग झाल्याचे समोर आले.

दरम्यान, आता न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृतानुसार रेकॉर्डेड फ्युचर या सायबर सेक्युरिटी कंपनीने सविस्तर ब्लॉग प्रकाशित केला आहे. यामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध लावल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मालवेअरचा वापर करून मुंबईला वीजपुरवठा करणारी यंत्रणा हॅक करण्यात आल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER