खंडणी मागणार्‍याला मद्यविक्रेत्याने दुकानातच डांबले !

arrested

मुंबई :  एका खंडणीखोराला मद्यविक्रेत्याने दुकानातच डांबून, नंतर पोलिसांच्या हवाली केल्याची घटना मुंबईत घडली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या या ५५ वर्षीय खंडणीखोराला मुंबई पोलिसांनी अटक केली असून, राजेंद्र वाघमारे, असे या आरोपीचे नाव आहे.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आहे. त्याच्या इतर तीन साथीदारांचा शोध सध्या सुरू आहे. भावेश पटेल यांचे दक्षिण मुंबईत ‘वर्ल्ड ऑफ वाईन्स’ नावाचे मद्यविक्रीचे दुकान आहे.

तेथे चौघे इसम आलेत आणि त्यांनी दरमहा पाच लाखांची खंडणी देण्याची मागणी पटेल यांना केली. त्यातील राजेंद्र वाघमारे हा आरोपी पुन्हा आला आणि त्याने परत खंडणीची मागणी केली.

तेव्हा पटेल आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी दुकान आतून बंद केले आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी येऊन वाघमारेला अटक केली. दरम्यान, इतर तीन आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी सांगितले.