मुक्ता…स्माइल प्लीज

Swapnil Joshi - Mukta Barve

समोर वेस्टर्न आउटफीटसमध्ये सजलेली मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि तिच्या या लूकला मोबाइल कॅमेऱ्यात क्लिक करण्याच्या तयारीत असलेला स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) असा सीन नक्की कुठे सुरू आहे हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. मालिका आणि सिनेमांमध्ये भरपूर एकत्र काम केल्याने केमिस्ट्री जुळलेलं ही ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भलतीच आवडीची आहे. एका अॅवार्ड फंक्शनच्या निमित्ताने मुक्ताला स्वप्नीलने कॅमेऱ्यात क्लिक केलं आणि ऑफस्क्रीनदेखील मुक्ता आणि स्वप्नील यांच्यात किती छान मैत्रीचं नातं हे दाखवून् दिलं.

ए माझा जरा फोटो काढ रे असे संवाद कार्यक्रमासाठी छान सजलेल्या मुली आपल्या मित्रांना हक्काने सांगतात. ग्रुपमधील कुणाच्यातरी लग्नात हा सीन हमखास सुरू असतो. शिवाय फॅमिली फंक्शनमध्ये हॉलचा एक छानचा कोपरा पकडून तिथे असं एखादं फोटोसेशन सुरू असतंच. तर असच काहीसं स्वप्नील आणि मुक्ताचंही झालं आणि आठ दहा क्लिकनंतर मुक्ताला हवा तसा तिचा फोटो काढून स्वप्नीलने हुश्शं केलं.

मरून रंगाचा लाँगड्रेस, केसांचा पफ, हलकासा मेकअप अशा नेहमीपेक्षा वेगळ्याच लूकमध्ये मुक्ता भलतीच सुंदर दिसतेय या फोटोत. स्वप्नीलनेही कॅज्युअल्स लूक स्वताला दिलाय. मुक्ताला खास पोझ घ्यायला सांगून स्वप्नीलने तिचे खूप फोटोही काढले. आता हा सगळा सीन तिसऱ्या व्यक्तीने त्याच्या मोबाइलमध्ये शूट केला आणि तो व्हिडिओ स्वप्नीलने त्याच्या इंस्टापेजवर शेअर करत मुक्ता…स्माइल प्लीज अशी छानशी कॅप्शनही दिलीय.

खरंतर सेलिब्रिटी कलाकारांवर नेहमीच कॅमेऱ्याचे फ्लॅश पडत असतात. त्यांच्याभोवती असलेल्या प्रसिदधीच्या वलयाचा तो एक भागच असतो. शिवाय मालिका, सिनेमा, नाटक यांच्या प्रमोशनसाठी फोटोशूट करावं लागतच की. पण जेव्हा जसं सहजपणे फोटो काढण्याचा आनंद मिळतो तेव्हा कलाकारांसाठीही हा क्षण खास बनतो. मुक्ता आणि स्वप्नील यांनी ग्लॅमरच्या पलीकडे जात एका पुरस्कार सोहळ्याच्या झगमगाटापासून काहीसे लांब जात हा क्षण टिपला.

मुक्ता आणि स्वप्नील यांची जोडी पडद्यावर नेहमीच नवं काहीतरी घेऊन आली आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट या मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या विषयावरील कथेत मुक्ता आणि स्वप्नील भाव खाऊन गेले होते. मुंबई पुणे मुंबई या सिनेमातही या दोघांची जोडी रंगली. त्यानंतर या सिनेमाचे पुढचे दोन भागही प्रदर्शित झाले ज्यामध्ये हीच जोडी होती. शुभमंगल वन्समोअर हा सिनेमादेखील दोघांनी केला. लग्न या मध्यवर्ती वन लाइन स्टोरीवर या दोघांनी एकत्रित खूप काम केल्यामुळे एका मुलाखतीत विवाह किंवा जोडीदार याकडे तुम्ही कसे पाहता असा प्रश्न एकदा दोघांना विचारला होता. या प्रश्नावर मुक्ता म्हणाली होती, की मी अजून लग्न केलेलं नाही कारण मला जोडीदार म्हणून कुणी आवडलेलं नाही. तुझ्या वयाच्या सगळ्यांची लग्नं झाली म्हणून मी लग्न केलं पाहिजे हे मला पटत नाही. आता मी जितकी आनंदी आहे तो आनंद लग्नानंतर वाढणार असेल तरच सहजीवनाला अर्थ आहे. ही व्यक्ती माझ्या आयुष्याचा जोडीदार होऊ शकते असं मनापासून वाटलं तरच मी लग्न करेन. याच प्रश्नावर स्वप्नील लग्नाविषयी बोलताना म्हणाला होता की एखाद्याला बघून मनात व्हायोलीन वाजली पाहिजे. माझ्या बायकोला पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला ती भावना जाणवली होती. ती माझ्यासोबत माझ्या कुटुंबातही समरसून गेली आहे. सहजीवन हे असं असलं पाहिजे. मुक्ताने अभिनेता ललित प्रभाकर याच्यासोबत स्माइल प्लीज या सिनेमातही, नशीब आयुष्याचा जोडीदार निवडण्याची संधी जेव्हा नव्याने देतं तेव्हा मनाचा होणारा गोंधळ या विषयावरही भाष्य केलंय. जोडीदार निवडण्याचा निर्णय एकदा चुकला म्हणून सगळं आयुष्य एकटेपणाने काढण्यापेक्षा पुन्हा एकदा आयुष्याला संधी द्यावी असं हा सिनेमा सांगतो.

तर थोडक्यात काय, एकमेकांसोबत खूप काम केल्यानंतर सहकारी कलाकार म्हणून, मित्र म्हणून विचारांची केमिस्ट्रीही जुळलेल्या मुक्ता आणि स्वप्नीलच्या या अनोख्या फोटोसेशनचा आनंद दोघांनीही मनमुराद घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER