मुकेश व अनिल अंबानींसह त्यांच्या पत्नींना ठोठावला २५ कोटींचा दंड

Anil Ambani - SEBI - Mukesh Ambani
  • रिलायन्स शेअर गैरव्यवहारात ‘सेबी’ची कारवाई

मुंबई : मुकेश (Mukesh Ambani) व अनिल अंबानी (Anil Ambani) हे दोघे उद्योगपती बंधू, अनुक्रमे नीता व टिना या त्या दोघांच्या पत्नी यांच्यासह रिलायन्स इंडस्ट्रिजशी संबंधित एकूण ३८ व्यक्ती व कंपन्यांना ‘सेक्युरिटिज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (SEBI) एकूण २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गेली १० वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकरणात ‘सेबी’चे निवाडा अधिकारी के. सर्वानन यांनी हा आदेश दिला. अंबानी व इतरांना दंडाची रक्कम ४५ दिवसांत जमा करण्यास सांगण्यात आले आहे.

या ३८ व्यक्ती व कंपन्यांना जानेवारी २००० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचे एकूण १२ कोटी शेअर प्रत्येकी ७५ रुपये या दराने जारी करण्यात आले होते. हे शेअर प्राप्त करताना या मंडळींनी ‘सेबी’च्या ‘टेकओव्हर रेग्युलेशन्श’मधील नियम क्र. ११(१) चे उल्लंघन केले, असा ठपका ठेवून हा दंड ठोठावण्यात आला.

या ३८ व्यक्ती व कंपन्यांना सन १९९४ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रत्येकी ५० रुपये दर्शनी मूल्याचे एकूण सहा कोटी ‘नॉन कव्हर्टिबल सेक्युअर्ड रिडिमेबल डिबेन्टर’ (NCD) घेतले होते. हे डिबेन्टर रिलायन्सच्या शेअर्समध्ये परिवर्तित करून घेण्याचा पर्याय होता. या सर्वांनी तो पर्याय स्वीकारला म्हणून त्यांना डिबेन्चरच्या बदल्यात वरीलप्रमाणे शेअर जारी करण्यात आले होते.

‘सेबी’ म्हणते की, या शेअर व्यवहारांची जी माहिती एप्रिल २००० मध्ये मुंबई शेअर बाजारास सादर करण्यात आली. त्यात या ३८ व्यक्ती व कंपन्यांना रिलायन्सच्या ‘प्रवर्तकांच्या समन्वयाने कार्य करणाऱ्या व्यक्ती’ (Persons Acting in Consort with Promotors) असे संबोधण्यात आले होते. याचा परिणाम असा झाला की, त्या वित्तीय वर्षात रिलायन्स इंडस्ट्रिजमधील प्रवर्तक व त्यांच्या गोतावळ्याचा एकूण भागभांडवलातील हिस्सा ६.३३ टक्क्यांनी वाढून २९.५४ टक्क्यांवर पोहचला. सोबतच त्यांच्या मतदानाच्या हक्कातही त्याच प्रमाणात वाढ झाली.

‘सेबी’च्या ‘टेकओव्हर रेग्युलेशन्स’मध्ये कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीतील त्यांचे भागभांडवल कोणत्याही एका वर्षात पाच टक्क्यांहून अधिकने वाढविण्यास मज्जाव आहे. एखाद्या वर्षी ही मर्यादा ओलांडली जात असेल किंवा ओलांडली गेली असेल तर त्याची माहिती इतर शेअरधारकांच्या माहितीसाठी जाहीर करण्याचे बंधन त्यांच्यावर आहे. अंबानी व त्यांच्यासोबतच्या या एकूण ३८ जणांनी हे बंधन पाळले नाही म्हणून त्यांना हा दंड करण्यात आला.

ज्यांना दंड झाला आहे त्यांत दोन्ही अंबानी दाम्पत्ये आणि आकाश, ईशा व जयअनमोल या त्यांच्या मुलांखेरीज दत्तराज साळगावकर, त्यांची पत्नी दीप्ती व विक्रम आणि इशेता ही त्यांची मुले तसेच नीना व नयनतारा या मुकेश अंबानींच्या दोन मेहुण्यांखेरीज रिलायन्स समूहाशी संबंधित काही कंपन्यांचा समावेश आहे. शेअरचे हे व्यवहार झाले तेव्हा आकाश, ईशा व जयअनमोल ही अंबानींची मुले सज्ञान नव्हती. त्यामुळे त्यांच्यावतीने व्यवहार करणारे पालक म्हणून मुकेश व अनिल यांना त्यांच्याजागी जबाबदार धरले गेले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button