मुकेश अंबानींना ‘त्या’ दिवशी आलेला धमकीचा मेसेज तिहार जेलमधून

Mukesh Ambani

मुंबई : २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ कार सापडली. यात जिलेटीनच्या २० कांड्या, बोगस नंबर प्लेट्स आणि धमकीचे पत्र सापडले होते. या घटनेनंतर मुंबईत खळबळ माजली. त्यानंतर अंबानींच्या मोबाईलवर धमकीचा टेलिग्राम मेसेज आला. हा मेसेज दिल्लीतील तिहार जेलमधील बराकमध्ये वापरत असलेल्या मोबाईलमधून आला असल्याचे तपासात समोर आले आहे.

हा फोन क्रमांक तिहार जेलमध्ये वापरला जातो. याबाबत दिल्ली पोलीस तपास करत आहेत. तसेच या बराकमध्ये जैश-ए-मोहम्मद, इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांसह १५ जण हा मोबाईल वापरत असल्याची शक्यता वर्तवली आहे. या दहशतवाद्यांपैकी कोणी धमकीचा मेसेज अंबानींना केला? याचा तपास पोलीस करत आहेत.

सूत्रानुसार, २६ फेब्रुवारी रोजी टेलिग्राम चॅनेल तयार करण्यात आला आणि अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ ठेवल्याची जबाबदारी घेणारे मेसेज २७ फेब्रुवारी रोजी रात्री अंबानींच्या टेलिग्राम मेसेजिंग अ‍ॅपवर पोस्ट करण्यात आला. या मेसेजमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे पाठवण्याची मागणीदेखील केली आणि ती जमा करण्यासाठीच्या लिंकचा उल्लेख केला होता.

चौकशीदरम्यान, ती लिंक “उपलब्ध नाही” म्हणून आढळले, त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी कृत्य करत असल्याचा संशय आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. २८ फेब्रुवारीला जैश-उल-हिंदचा सोशल मीडियावर आणखी मेसेज आला आणि घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला गेला.

सुरुवातीला या प्रकरणातील तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. त्यानंतर गृहमंत्र्यांनी याचा तपास एटीएसकडे सुपूर्द केला. आता या प्रकरणाचा तपास एटीएसकडून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या NIA कडे वळविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER