एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीला निरोप

MSK Prasad And Sourav Ganguly

जुन्या घटनेनुसार चारच वर्षात संपवला कार्यकाळ लोढा समितीने केली होती पाच वर्षांची शिफारस


मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने एम.एस.के.प्रसाद यांच्या नेतृत्वातील वरिष्ठ निवड समितीला निरोप देण्याचा निर्णय रविवारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला. या निर्णयासह बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीच्या शिफारशी झुगारुन जुन्याच घटनेनुसार निर्णय घेण्यास सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोढा समितीनुसार निवड समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा होता तर जुन्या घटनेनुसार हा कार्यकाळ चारच वर्षांचा होता. मात्र आता बीसीसीआयने घेतलेल्या ताज्या निर्णयामुळे एम.एस.के.प्रसाद यांच्या अध्यक्षतेतील निवडसमितीला रविवारीच निरोप मिळाला आहे.

या निवडसमितीचे अध्यक्ष प्रसाद व सदस्य गगन खोडा यांची नियुक्ती २०१५ मध्ये झाली होती तर समितीचे इतर सदस्य जतीन परांजपे, शरणदीपसिंग व देवांग गांधी यांची नियुक्ती २०१६ मध्ये झाली होती मात्र आता प्रसाद यांचा कार्यकाळ संपल्याबरोबर ही समितीसुद्धा कार्यरत राहू शकणार नाही.

कार्यकाळ संपला आहे आणि त्याच्या पलीकडे तुम्ही काम करुशकत नाही. या समितीने चांगले काम केले असा अभिप्राय देत मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या समितीला निरोप दिला आहे. आम्ही निवडकर्त्यांचा कार्यकाळ निश्चित करु आणि दरवर्षी निवडकर्ते नियुक्त करणे ही चांगली गोष्ट नाही असे त्यांनी म्हटले आहे.