महावितरण भरती : मराठा उमेदवारांबाबत स्थिती संभ्रमाची

Nitin Raut

मुंबई :- महावितरणच्या भरतीत एसईबीसी प्रवर्गातील मुलांवर अन्याय होऊ देणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले होते; मात्र याबाबत त्यांनी जे पत्रक काढले  आहे त्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मराठा समाजातील युवक अस्वस्थ झाले आहेत. यातून या युवकांनी टोकाचे पाऊल उचलले तर त्याची जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा मराठा क्रांती मोर्च्याचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिला.

ते म्हणालेत, ऊर्जामंत्री नितीन राऊत विविध माध्यमांशी बोलताना महावितरण कंपनीमधील अनुक्रमे उपकेंद्र सहायक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांमधील एसईबीसी प्रवर्गातील मराठा समाजातील तरुणांवर अन्याय न होऊ देता त्यांनादेखील नोकरीत समाविष्ट करून घेतलं जाईल असं सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात जी ऊर्जा विभागाकडून काढण्यात आलेली प्रेस नोट आहे, यामध्ये मात्र उपकेंद्र सहायक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदासाठी मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्ग सोडून जे इतर प्रवर्गातील तरुण आहेत त्यांना घेतलं जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

यामुळे लक्षात येते की, मागील काही दिवसांपासून ऊर्जामंत्री नितीन राऊत मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करत आहेत. सध्या राज्यभरातील मराठा समाजातील तरुणांचे आम्हाला फोन येत आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आम्हाला माध्यमांना दिलेल्या मुलाखतीनुसार ऊर्जा विभागात समाविष्ट करून घेतलं नाही तर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असे मेसेजेस येत आहेत. जर ऊर्जामंत्री यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर राज्यभरातील मराठा समाजातील तरुण कोणत्या स्तराला जातील सांगता येणार नाही. आणि जर अशी काही परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला केवळ महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा क्रांती मोर्च्याचे  मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा : वीज कापायला आलात तर मनसे स्टाइल ‘शॉक’ देऊ – अविनाश जाधव यांचा इशारा

अधिक माहिती देताना राजन घाग म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने सध्या भरती प्रक्रियेबाबत प्रचंड घोळ चालवला आहे. ज्या वेळी नितीन राऊत यांनी सांगितले होते की, आम्ही एसईबीसी प्रवर्गातील मुलांवर अन्याय होऊ देणार नाही त्या वेळी आम्हाला बरे  वाटले  होते. परंतु त्यांनी जे पत्रक काढले  आहे त्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही मशाल मोर्चा काढला. आम्हाला आश्वासन देण्यात आले  होते  की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांत भेट करून देण्यात येईल; परंतु आजपर्यंत आमची भेट करून देण्यात आलेली नाही. आज दहा दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे आता वीज वितरण विभागाच्या विषयावरून जर मराठा समाजात नैराश्य पसरलं आणि त्यातून जर कोणी आत्महत्या केली तर त्याला सरकार जबाबदार असेल. या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही लवकरच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊ आणि महावितरण विभागाच्या भरती प्रक्रियेबाबत स्पष्टता आणावी याबाबत त्यांना विनंती करू.

ही बातमी पण वाचा : वीज बिलाच्या सवलतीसाठी रस्त्यावर उतरू; रक्षा खडसे यांचा सरकारला इशारा

सध्याचं सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे प्रचंड दुर्लक्ष करत आहे. आम्ही मागणी केली, अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवा तर यांनी मराठा समाजासाठी प्रचंड काम करणाऱ्या नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटवले. त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी मुंबईत मशाल मोर्चा काढला होता. आता तो प्रत्येक जिल्ह्यातून काढण्यात येणार आहे, असे घाग म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER