महावितरणचा ग्राहकांना झटका; पुण्यात ३६ हजार थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित

MSEDCL

पुणे : सतत आवाहन करूनही थकीत वीज बिलांचा भरणा होत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने (MSEDCL) आता मोठे पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. सलग १० महिने एकही वीज बिल न भरलेल्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला महावितरणने सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील ३६ हजार १३९ थकबाकीदारांचा वीज पुरवठा ८९ कोटी ५५ लाखांच्या थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या १ फेब्रुवारीपासून पुणे परिमंडळात थकीत वीज बिलांचा भरणा वाढला असून १ एप्रिल २०२० पासून एकही वीज बिल न भरलेल्या ९७ हजार ४१३ ग्राहकांनी आतापर्यंत १४५ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. चालू आणि थकीत वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शुक्रवार (१९ फेब्रुवारी) ते रविवारपर्यंत (२१ फेब्रुवारीपर्यंत) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.

केवळ वीज बिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणाऱ्या महावितरणची स्थिती ही वीज खरेदी, दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत सध्या राहिलेली नाही. त्यामुळे नाइलाजाने वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER