मृणालचा लाइफ फंडा

Mrunal

असं म्हणतात की जे मिळालं नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे समोर आहे, जे सोबत आहे त्याचा आनंद साजरा करणं जास्त महत्त्वाचं असतं. पुस्तकात हे वाक्य जितकं शोभून दिसतं त्याहून जास्त जर या वाक्याचा अर्थ आपण आयुष्यात खरा केला तर या वाक्याचे सार्थक होतं. अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने या वाक्याला स्वतःच्या सकारात्मक विचाराने अर्थ दिला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे काही दिवसांपूर्वी निर्माता मंदार देवस्थळी यांनी सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेतील कलाकारांचे आठ ते नऊ महिन्यांचे मानधन अजूनही दिले नसल्यामुळे या सगळ्याच कलाकारांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून तक्रार करत या विषयाला तोंड फोडलं होतं.

हे प्रकरण मनोरंजन विश्वात चांगलेच गाजले. मानधन थकवलेल्या कलाकारांमध्ये अभिनेत्री मृणाल दुसानीस हीदेखील आहे. अर्थात जेव्हा हा विषय सोशल मीडियावर चर्चेला आला तेव्हा मृणालने देखील आपली नाराजी आणि तक्रार बोलून दाखवली होती. पण आता मात्र मृणाल हिने त्या गोष्टीच्या तक्रारींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा पती नीरज सोबत अमेरिकेमध्ये आनंदाचे क्षण घालवण्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. मृणालच्या या निर्णयावर तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी तिला पाठिंबा देत तिच्या निर्णयाचेही कौतुक केले आहे.

मालिका विश्वातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसची ओळख आहे. सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेत ती अनुश्री दीक्षित ही भूमिका साकारत होती. ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली आणि काही दिवसातच या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान करोनाचे संकट वlघोंगावले आणि लॉक डाऊनमुळे या मालिकेचे चित्रीकरण थांबलं होतं. जेव्हा अनलॉक झालं आणि त्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली त्यानंतर या मालिकेचे सर्व कलाकार पुन्हा एकदा चित्रीकरणात सहभागी झाले.

एकीकडे कोरोनामुळे निर्माण झालेली विचित्र परिस्थिती व चित्रीकरण सुरू झाल्यानंतरही मानधन न मिळाल्याची चिंता या वातावरणातही मालिकेच्या कलाकारांनी निर्माता मंदार देवस्थळी यांना सहकार्य करून मालिका पूर्ण केली. दोन महिन्यापूर्वी ही मालिका मालिका संपली. मालिका संपून इतके दिवस होऊन गेल्यानंतरही काही कलाकारांना गेल्या नऊ महिन्यांचे मानधन मिळालं नव्हतं. याबाबत सुरुवातीला या मालिकेतील अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर हा विषय पोस्ट केला व त्यानंतर त्याला मानधन देण्यात आले. पण अजूनही मृणाल दुसानीस, शर्मिष्ठा राऊत, विदिषा म्हस्कर यांना मानधन मिळालं नाही. यावरूनच या सगळ्या कलाकारांनी पुन्हा एकदा तक्रारीचा पाढा वाचत निर्माता देवस्थळी यांना लक्ष्य केलं. दरम्यान ही मालिका संपल्यानंतर मृणाल तिचा पती नीरज मोरे याच्याकडे अमेरिकेला निघून गेली. अमेरिकेतूनच तिने थकीत मानधनाविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता.

खरे तर मृणाल अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आणि तिचा पती नीरज मोरे हा अमेरिकेमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत असल्यामुळे या दोघांना एकमेकांसोबत मुळातच खूप कमी वेळ मिळतो. याच अनुषंगाने मृणाल तिची मालिका संपल्यामुळे अमेरिकेमध्ये पतीकडे गेली आहे. पण आता थकीत मानधन विषयी उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या मृणाल ने अचानक ही तक्रार करण्याचं थांबवत आयुष्यातील आनंद साजरा करण्यावर तिचं लक्ष केंद्रित केल्याची पोस्ट आणि नीरज सोबतचा फोटो शेअर केला आहे.

याबाबत मृणाल सांगते, हो, अजूनही मला सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेचे थकित मानधन मिळालेले नाही. अर्थात त्याविषयी जे काही भाष्य करायचं ते मी केले आहे. मानधन न मिळण्याबाबत निर्मात्यांनी केलेली चालढकल असेल किंवा आम्हाला दिलेली खोटी कारणे असतील या सगळ्यांविषयी मी माझं मत यापूर्वी व्यक्त केल आहे. पण जशी मी अभिनेत्री आहे तशीच मी नीरज ची बायको आहे. आमच्या लग्नाला तीन वर्षे झाली. माझ्या कामामुळे मी मुंबईत तर नीरज अमेरिकेत आहे. सध्या मी अमेरिकेत नीरज सोबत असून मला माझ्या कामातील टेन्शनचा किंवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रॉब्लेम्सचा परिणाम आमच्या दोघांच्या नात्यावर व्हावा असं वाटत नाही. त्यामुळेच मानधनाचा विषय डोक्यात घेऊन माझ्या सध्याच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण मला गमवायचे नाहीत. म्हणूनच मी असं ठरवलं की आता यावरून मी कुठलीही पोस्ट करणं किंवा काही त्याबाबत बोलणं हे टाळून नी जो मला वेळ मिळालेला आहे तो मी तुम्ही छान घालवणार आहे. आम्हाला दोघांना यानिमित्ताने क्वालिटी टाइम घालवायचा आहे.

मृणालने घेतलेल्या या निर्णयामुळे, माणसाचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य हे वेगळे असले पाहिजे हेदेखील दाखवून दिले आहे. ठराविक मर्यादेपर्यंत आपल्या व्यावसायिक आयुष्यातल्या समस्यांवर चर्चा केली पाहिजे, त्यानंतर आपली नाती, त्या नात्यांमधला ओलावा, सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्येही नाती जपण्यासाठी मिळणारा वेळ हे जास्त महत्त्वाच आहे असेही या निमित्ताने मृणालने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER