दि वॉल ते मिस्टर डिपेंडेबल : भारतीय क्रिकेटमधील भरोशाचे दोन ‘राहुल’

KL Rahul.jpg

राहुल नावाच्या क्रिकेटपटूंची एक खासियत असते. त्यांच्याकडून लोकांच्या फार अपेक्षा असतात आणि त्यांच्यावर एक भरवसा असतो की हा ‘राहूल’ चांगलाच खेळेल. मिस्टर डिपेंडेबल म्हणतात त्यांना…असे असले तरी जगन्मान्यता त्यांना सहज मिळत नाही. फार संघर्ष करावा लागतो. ‘द वॉल’ नंतर आता ‘मिस्टर अडॉप्टेबल’ म्हणजे लोकेश राहुल (K.L. Rahul) बद्दल आपण हे अनुभवतोय.

राहुलला मिस्टर अडॕप्टेबल का म्हणायचे तर त्याला सलामीला खेळवा, मध्ये खेळवा, विकेटकिपर ठेवा, नका ठेवू, कर्णधारपद सोपवा..सगळ्या गोष्टींना, सर्व आव्हानांना तो तयारच असतो.आता यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) किंग्ज इलैव्हन पंजाबच्या (Kings XI Punjab) नेतृत्वाची नवी जबाबदारी त्याने स्विकारली आहे आणि ती तो समर्थपणे हाताळतोय. दिल्लीविरुध्द (Delhi Capitals) शॉर्ट रनमुळे गमावलेला सामना असो की, रॉयल चॕलेंजर्स बंगलोरविरुध्दचा (Royal Challengers Bangalore) एकतर्फी विजय असो, तो चमकलाय.

आरसीबीविरुध्द तर लिडींग फ्रॉम दी फ्रंट अशी खेळी करत त्याने 69 चेंडूत 14 चौकार व 7 षटकारांसह 132 धावा केल्या. सलामीला येऊन तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. आयपीएलमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचीही सर्वोच्च खेळी ठरली आणि त्यादरम्यान आयपीएलमधील 2000 धावा त्याने सर्वात जलद पूर्ण केल्या. सचिन तेंडूलकरपेक्षाही 3 कमी डावातच (63-60) त्याने हा टप्पा गाठला. एवढंच नाही तर गुरुवारी दुबईत (Dubai) राहुलने एकट्याने धावा केल्या 132 आणि आरसीबीचा पूर्ण संघ बाद झाला फक्त 109 धावांतच. काही बोलायची गरजच नाही.

योगायोग पहा, दी वॉल राहुल असो की मिस्टर अडॕप्टेबल राहुल, दोघेही भरवशाचे फलंदाज, दोघेही यष्टीरक्षक, दोघेही कर्नाटकचेच आणि दोघेही कोणत्याही क्रमावर खेळण्यास तयार.

आर.अश्विनने दिल्लीकडे जाण्याचा निर्णय घेतल्यावर किंग्ज इलेव्हनच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाईल याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत्या पण नेस वाडिया यांनी लिलावाच्या दिवशीच स्पष्ट केले की, यंदाच्या सिझनसाठी के.एल. राहुल आमचा कर्णधार असेल. ते म्हणाले की बऱ्याच चढउतारांतून तो पुढे आला आहे.आणि त्याने त्याच्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. फलंदाज म्हणूनच नाही तर कर्णधार म्हणूनही तो या मोसमात आपले कर्तृत्व सिध्द करेल. तो एकमताने आमचा कर्णधार आहे.

राहुलने 2013 मध्ये रॉयल चॕलेंजर्सकडून सुरुवात केली. 2014 व 15 मध्ये तो सनरायजर्स कडून खेळला. या दोन्ही संघांकडून त्याची काही विशेष कामगिरी राहिली नाही. 2016 मध्ये आरसीबीच्या तंबूत परतताना त्याने 397 धावा केल्या आणि या मोसमात त्याने खरी ओळख निर्माण केली. 2017 चे आयपीएल खांद्याच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही आणि राॕयल चॕलेंजर्सने त्याला मोकळे केले. 2018 पासून तो किंग्ज इलेव्हनच्या तंबूत आला. त्यांनी त्याच्यासाठी 11 कोटी मोजले आणि विराट कोहली व एबी डीविलियर्स यांच्या छायेतून बाहेर येत त्याने किंग्ज इलेव्हनचा प्रमुख फलंदाज म्हणून नाव कमावले. गेल्या दोन मोसमात त्याच्या अनुक्रमे 659 व 593 धावा राहिल्या. आणि आता यंदा रॉयल चॕलेंजर्सविरुध्दच भारतीय खेळाडूतर्फे सर्वोच्च खेळी करत त्याने वर्तुळ पूर्ण केले आहे.

आपली ओळख निर्माण करणाऱ्या 2016 च्या मोसमाबद्दल तो म्हणतो की, त्या मोसमाने माझ्यातील विश्वास जागवला. आणि मर्यादीत षटकांच्या सामन्यात आपण काय करू शकतो हेसुध्दा दिसून आले. लोकांनाही माझ्याबद्दल विश्वास वाटायला लागला आणि लोकांचा, तुमच्या सहकाऱ्यांचा तुमच्यावर विश्वास असणे फार महत्वाचे असते.

मध्यंतरी आयपीएल 2019 मध्ये ‘कॉफी विथ करण’ प्रकरणाने त्याची कारकिर्द धोक्यात आली होती पण संधी मिळाली आणि त्याने आपली उपयुक्तता सिध्द केली. 14 सामन्यात 54 ची सरासरी आणि 135 च्या स्ट्राईक रेटने त्याने 593 धावा जमवल्या.

या काळात तो भारताचा पहिली चॉईस विकेटकीपरही बनला आणि आता पंजाबचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात धोनी व कोहलीची झलक दिसते त्याबद्दल तो म्हणतो की एकतर त्यांच्या नेतृत्वात खेळत असतानाच मी बऱ्याच गोष्टी शिकलोय आणि गेल्या 10 वर्षांत या दोघांएवढा इतर कुणाचाच प्रभाव भारतीय खेळाडूंवर नाही. अनिल कुंबळेंसारखे अनुभवी प्रशिक्षक आम्हाला लाभलेत हे आमचे भाग्यच. त्यांना खेळाडूंची मानसिकता व त्यांच्यासमोरच्या आव्हानांची फार उत्तमरित्या माहिती आहे.

कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल तो म्हणतो की, ही जबाबदारी मला वेगळ्या पध्दतीने विचार करायला शिकवेल. पण खेळाडू असो की कर्णधार असो, आपले उद्दिष्ट एकच असते…सामना जिंकणे. यंदा आमची फलंदाजी फळी चांगली आहे. त्यामुळे मला अधिक मोकळेपणाने खेळता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER