बर्मुडावाले साहेब अन् हिप्पीवाला साथी

Mantralaya

मुंबई : एका मंत्र्याकडे सध्या बर्मुड्यात वावरणाऱ्या एका व्यक्तीची फारच चर्चा होत आहे. त्या मंत्र्याकडे गेल्यानंतर हे साहेब बर्मुडा घालून बसलेले असतात आणि प्रत्येक गोष्टीत अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतात. बर्मुड्यातील साहेबांशी चर्चा केली तरी सगळे प्रश्न सुटतात असा अधिकाऱ्यांचा अनुभव आहे.

मंत्रालयानजीकच्या बंगल्यावर या बर्मुडावाल्या साहेबांची खूपच चलती आहे. भेटायला आलेले अधिकारी, शिष्टमंडळं, कंत्राटदार यांच्याशी हे साहेबच संवाद साधतात. प्रत्येक निर्णयप्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. घरचा माणूस असल्याने त्यांना कोणी रोखू शकत नाही. संवैधानिक पदावर नसूनही हे साहेब प्रत्येक गोष्टीत दखल का देतात, असा प्रश्न विचारण्याची कोणाचीही हिंमत होत नाही.

हे साहेब प्रत्येक फाईल समजून घेतात, काय हवे नको ते सांगतात. धोरणात्मक विषयावरही चर्चा करतात आणि स्वत:ची मते देतात. एखाद्या प्रस्तावात काय बदल करावेत याची सूचना अधिकार वाणीने करतात. महाराष्ट्राचे शिक्षण हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. त्यात त्यांना विविध प्रकारचा ‘रस’ (इंटरेस्ट) आहे. सर्व प्रकारच्या व्यवहाराच्या नाड्या या साहेबांच्या हातात आहेत असे म्हटले जाते. कोणी कितीही मोठी व्यक्ती मग ती पुरुष असो की महिला हे साहेब बर्मुड्यावरच असतात.

आता त्यांच्या दिमतीला एक हिप्पीवाला माणूस आला आहे. त्याने आपल्या बटा चांगल्याच वाढविल्या आहेत. आधी तो पत्रकार होता, एका नामवंत दैनिकात पत्रकारिता करीत होता. तेथून त्याने राजीनामा दिला की त्याला घरी पाठविले हे कळले नाही; पण आता मंत्र्यांच्या दरबारात त्याला चांगलाच भाव आलेला आहे. खात्याशी संबंधित मोठमोठे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्याला सहभागी करून घेतले जाते इतका तो ‘असर’दार आहे. मंत्रीदेखील त्याचा सल्ला घेतात. अधिकाऱ्यांनी त्याच्या सल्ल्याने काम करावे, असे सांगितले जाते.

हा हिप्पीवाला मग अधिकाऱ्यांना उद्दामपणे बोलतो. बंगल्यावर आलेल्या लोकांकडे नाही नाही ती चौकशी करीत असतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलीच गेली पाहिजे असा त्याचा अट्टहास असतो. प्रत्येक विषयात आपल्यालाच कळते असा त्याचा भ्रम आहे. मंत्रालयातील दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी या हिप्पीवाल्या पत्रकाराविरुद्ध गंभीर तक्रारी तो काम करीत असलेल्या इंग्रजी दैनिकाच्या व्यवस्थापनाकडे केल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल व्यवस्थापनाने घेतली आणि या हिप्पीवाल्या बाबाला घरी पाठवले गेले, अशीही चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button