MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या मागण्या काय? ; नागपुरातही आंदोलन

MPSC Student Protest

पुणे :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्याने पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. पोलीस विद्यार्थ्यांवर लाठीमारसुद्धा करत आहे.

संतप्त प्रतिक्रिया आणि मागण्या
कोरोनाचे (Corona) कारण देत परीक्षा रद्द करणे, हे कारण चुकीचे आहे. आरोग्य विभागाची परीक्षा झाली, यूपीएससीची, एनटीपीसीची परीक्षा घेतली जाते. परीक्षेसंदर्भात राजकारण केले जात आहे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावेत आणि तारखा जाहीर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. एप्रिल २०२०मध्ये होणारी परीक्षा मार्च २०२१ मध्ये होत असूनही ती पुढे ढकलली. आंदोलनाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जवळपास २ हजार आहे.

आमदार रस्त्यावर झोपले

यूपीएससी ते सीईटीच्या परीक्षा होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात. १४ तारखेला होणारी परीक्षा झालीच पाहिजे. या परीक्षेमध्ये राजकारण करू नका, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिला आहे. हे गोंधळलेले सरकार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सरकारने निर्णय मागे घ्यावे; सत्यजीत तांबेंचे आवाहन

काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनीदेखील राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाला निषेध करतो, अचनाकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. या निर्णयावर तातडीने फेरविचार करा, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी संतापले आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी ऐकायला तयार नाही. ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली.

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावले आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे योग्य नसल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपुरातही आंदोलन
सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद नागपूर आणि सांगलीमध्ये उमटले. नागपुरात सक्करदरा चौकात जमून सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. तर सांगलीमध्येसुद्धा विधार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. या आंदोलनात विध्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे.

दरम्यान, राज्य सरकाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यांनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या काही नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार यांनी परीक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER