
मुंबई :- राज्यात गेल्यावर्षी कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. MPSC च्या उमेदवारांनासुद्धा याचा फटका बसला आहे. मात्र, पुन्हा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे. MPSC ने परिपत्रक काढून यासंदर्भात माहीती जाहीर केली आहे. यथावकाश परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येतील, असेदेखील या पत्रामध्ये नमूद आहे. त्यामुळे MPSCच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
येत्या १४ मार्च रोजी MPSCची मार्च २०२० मध्ये होणारी पूर्वपरीक्षा होणार होती. परीक्षेची सर्व तयारी झाली होती. उमेदवारांना प्रवेशपत्रदेखील देण्यात आले होते. अवघ्या २ दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, उमेदवारांकडून याविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मागील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या MPSCच्या पूर्व परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या. काहीसा कोरोनाचा ज्वर कमी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात त्या घेण्याचे ठरले. उमेदवारांनी तयारी सुरू केली. परीक्षेसाठी ११ ऑक्टोबर तारीखदेखील ठरली. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबितच असल्यामुळे ती पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरला होणाऱ्या दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला