एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

Uddhav-RajThackeray

मुंबई : राज्य लोकसेवा आयोग (MPSC) अर्थात एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन केला होता. त्यावेळी दोघांमध्ये एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नसले तरी त्यांची भूमिका सकारात्मक असल्याची माहिती पुढे आली आहे. एमपीएससीची पूर्वपरीक्षा ११ एप्रिलला होणार आहे.

मात्र, वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरांवरून  होऊ लागली आहे. विशेष गोष्ट म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला होता.

त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. दरम्यान, राज ठाकरेंसोबत इतर नेत्यांनीही एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ५६ हजार २८६ रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button