MPSC Exam : विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर जबाबदारी कोण घेणार; अमित ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray - Amit Thackeray

मुंबई : कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. MPSC परीक्षा १४ मार्चला होणार होती. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. या निर्णयाविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विविध पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरले आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल अमित ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्र MPSCची पूर्व परीक्षा १४ मार्चला होणार होती. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. MPSC परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी या निर्णयामुळे संतप्त झाले आहेत. पुणे, संभाजीनगर तसेच राज्यांत अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER