एमपीएससी परीक्षा : आपण चुकीचा पायंडा पाडतो आहे का ? – प्रवीण गायकवाड

pravin gaikwad

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यावरून मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gayakwad) यांनी अत्यंत योग्य, समंजस, विधायक भूमिका घेतलेली आहे. खासोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना आपण खरोखरच न्याय दिला का याचा विचार करायला हवा. परीक्षा देणारी ही मुल नेमकी कोण आहेत ? अपवाद सोडला तर ज्यांचे आई-वडील शेतकरी, कष्टकरी, मजूर, गरीब, निरक्षर आहेत अशांच्या मुलांचीच संख्या यामध्ये जास्त आहे.

ही मुले जेव्हा स्पर्धापरिक्षांच्या तयारीसाठी शहरात जातात तेव्हा त्यांच्या क्लासेस, अभ्यासिका, पुस्तके, खानावळी, खोली भाडे अशा विविध गोष्टींसाठी जवळपास दीड-दोन लाख रुपये खर्च येतो. या मुलांचे आई-वडील शेतात कष्ट करुन, मजुरी करुन, प्रसंगी दागिने गहाण ठेऊन किंवा कर्ज काढून या मुलांना महिन्याला पैसे पाठवत असतात. या मुलांना आणि त्यांच्या आई-वडिलांना एकच आशा असते की MPSC परीक्षा होईल आणि त्यामध्ये आपल्याला यशाची संधी मिळेल.

याच आशेवर राज्यात यंदाही जवळपास २ लाख ६० हजार विद्यार्थी MPSC राज्यसेवा परीक्षेला बसले होते. परंतु राज्य सरकारने ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलून या विद्यार्थ्यांना दिलासा दिला की त्यांच्यापुढे नवीन प्रश्न निर्माण केले आहेत याचा उहापोह आपण केला पाहिजे.

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलल्याने केवळ याच नाही, तर आयोगाच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. पुढच्या काळात होणाऱ्या सर्वच परीक्षा लांबणार आहेत. याचा परिणाम केवळ मराठाच नाही, सर्वच समाजाच्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. गेले दीड वर्षे रात्रंदिवस सोळा-सोळा तास अभ्यास करुन परीक्षा द्यायला सज्ज झालेल्या विद्यार्थ्यांचा यात काहीही दोष नसताना, केवळ परीक्षा पुढे ढकलल्याने पुढच्या काही काळात त्यांना येणारा खर्च, त्यांचा जाणारा वेळ, त्यांचे वाढणारे वय आणि त्यांना होणारा मनस्ताप याची जबाबदारी कोण घेणार ? याचा त्रास मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही होणार आहे या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली म्हणजे मराठा समाजाच्या SEBC आरक्षणाचा प्रश्न सुटला, असे नाही. SEBC आरक्षणाचा प्रश्न कधी मार्गी लागेल, त्याला किती वेळ जाईल याविषयी आतातरी नेमकेपणाने सांगता येत नाही. मग या विद्यार्थ्यांनी कुठपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे.

कोरोनाचे निमित्त सांगून ही परीक्षा पुढे ढकलण्याचे समर्थन केले जात असेल, तर ते चूक आहे. कारण नुकतेच ४ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रातही UPSC परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कोविडबाबत संपूर्ण सावधगिरी बाळगून पार पडल्याचे उदाहरण आपल्यासमोर आहे.

आपल्यामुळे कुणाचे नुकसान व्हावे, ही खरोखरच आपली कधीही दिशा नव्हती. परंतु आपली दिशा चुकते आहे हे मान्य करायचे सोडून केवळ MPSC परीक्षा होऊ दिली नाही, पुढे ढकलली म्हणून जे छाती बडवतात, आनंदोत्सव साजरा करतात; ते लोक ही परीक्षा न झाल्याने आपलेच काही बांधव नोकरीपासून वंचित राहत आहेत याचा विचार करत नाहीत.

आज मराठा समाजातील नेत्यांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरुन सरकारला MPSC परीक्षा पुढे ढकलायला भाग पाडले, उद्या अजून कुठल्या समाजातील नेत्यांनी असेच केले तर नुकसान फक्त विद्यार्थ्यांचे होणार आहे. आपण चुकीचा पायंडा पाडतो आहे का याचा विचार व्हायला हवा.

समाज भावनिक पातळीवर जाऊन विचार करत असाल तर त्यांना वास्तव सांगण्याचे धाडस आम्ही करत आहोत. यामध्ये आमच्यावर टीका होणार, बदनामी होणार, खिल्ली उडवली जाणार या सर्व शक्यता माहीत असताना आम्ही हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. कदाचित आज अनेकांना आम्ही सांगितलेल्या गोष्टी रुचणार नाहीत, पण येणारा काळच आमच्या भूमिका बरोबर की चुकीच्या हे सांगेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER