अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मराठवाडा दौऱ्यावर ​

Sambhaji Raje

सोलापूर : गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश भाग प्रभावित झाला आहे. विशेषतः मराठवाडा भागात या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे या नुकसानाकडे राज्यशासनाचे दुर्लक्ष होत असताना, युवराज संभाजीराजे छत्रपती हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

घटस्थापनेच्या दिवशी संभाजीराजे हे अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पंढरपूर व सांगोला भागातील नुकसानग्रस्त भागांत भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी द्राक्ष व डाळींब बागायतदार तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी राजेंकडे आपल्या व्यथा मांडल्या. आज संभाजीराजे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी, सुरतगाव, सिंदफळ, अपसिंगा, कात्री, कामठा, तुळजापूर, बसवंतवाडी, गंधोरा, सलगरा दिवटी, किलज, होर्टी, मुरटा, दहिटना, काटगाव या सर्वाधिक नुकसानग्रस्त भागांस भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राजे म्हणाले, झालेल्या नुकसानीची तीव्रता अधिक आहे. कोरोनामुळे आधीच बिकट परिस्थिती असताना ऐन सणासुदीच्या काळात हाती आलेले पीक अतिवृष्टीने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांपुढे फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पीक तर पूर्णपणे हातचे गेलेच आहे पण कित्येक ठिकाणी शेतातील मातीच वाहून गेली आहे, विहिरी बुजल्या आहेत, शेतात ओढे शिरले आहेत. त्यामुळे आता पुढे तरी शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे पंचनाम्यांसारख्या वेळखाऊ गोष्टीत सरकारने अधिक वेळ न दवडता ताबडतोब सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी राजेंनी सरकारकडे केली आहे.

संभाजीराजेंच्या या दौऱ्यास स्थानिक शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवार यांनी केलेल्या निराशाजनक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा संभाजीराजेंकडे आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून आपल्याला योग्य न्याय मिळवून देणारा आश्वासक चेहरा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढतो आहे. तूर्तास दोन दिवसांपासून हा दौरा सुरू असला तरी आणखी दोन ते तीन दिवस संभाजीराजे दौरा सुरु ठेवणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER