ही राजकारणाची नाही तर माणुसकीची वेळ आहे : खासदार सुप्रिया सुळे

Supriya Sule

मुंबई :- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 900 जवळ येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. ही राजकारणाची वेळ नाही. एकमेकांच्या हाताला धरून महाराष्ट्र व देश या संकटावर मात कसा करेल ती ही वेळ आहे त्यामुळे घरीच रहा. आजची देशसेवा हीच आहे, असे मत सुळे यांनी व्यक्त केले.

मी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच घरात इतका वेळ राहिले आहे. लॉकडाउन संपण्यासाठी ७ दिवस शिल्लक आहेत. लॉकडाऊन वाढवायचा की नाही तो निर्णय सरकार घेईल आणि तो तुमच्या माझ्या हिताचा असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे, अनिल देशमुख हे सातत्याने माध्यमांशी आणि जनतेशी संवाद साधून माहिती देत आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बीडसाठी पुन्हा धावले शरद पवार आणि रोहित पवार, तात्काळ केली मदत; धनंजय मुंडेंनी मानले आभार

हा विषय राजकीय नाही. कुणीही याचा गैरसमज करु नये. राजकारण करायची ही वेळ नाही. मलाही उलटेसुलटे मेसेज येतात, ते मी कधीच फॉरवर्ड करत नाही. कारण ही माणुसकीची वेळ आहे. कुणावरही टीका करायची वेळ नाही. आपल्याला एकमेकांचे हात धरुन जितकी आयुष्य वाचवता येतील, जितक्या लोकांना सेवा देता येईल याची ही वेळ आहे, असेही त्या म्हणाल्या.

जीएसटी बरोबर महाराष्ट्राला केंद्राकडून बराच निधी यायचा आहे. राज्यांना किंवा केंद्राला अडचणी आहेत परंतु महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. यावरही पंतप्रधान बोलतील. महाराष्ट्रात टास्कफोर्स स्थापन करण्याची विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सतत सर्वांच्या संपर्कात आहेत. ते बोलतात त्यावेळी सर्वांना आधार मिळतो. सरकारचे काम कसे सुरू आहे हे ही जनतेला समजते आहे, असेही त्या म्हणाल्या.

दिल्लीत ज्या घटना घडल्या याचे वाईट वाटते. दिल्लीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले त्यावेळी दंगल झाली. अशावेळी पोलीस आयुक्त काय करत होते. त्यानंतर मरकजची घटना झाली. त्याच पोलीस आयुक्तांनी त्यांना परवानगी दिली, अशी टीकाही सुळे यांनी केली आहे. तसेच प्रशासनाचे नक्की लक्ष आहे कुठे आणि प्रशासनाने दहा दिवसाच्या अंतरात या दोन गोष्टी होऊच कशा दिल्या ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


Web Title : It is not time for politics but humanity – Supriya Sule

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)