खासदार सुजय विखे यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे जाईल : दिपाली सय्यद

Deepali

नगर :- डॉ सुजय विखे यांनी साकळाई पाणी योजनेसंदर्भात माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांनी त्याबाबात माफी मागावी अन्यथा आपण महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा ईशार साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिला आहे.

‘देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे’, या आशयाचे वक्तव्य साकळाई पाणी योजनेबाबत विखे यांनी गुंडेगाव (ता. नगर) येथे मागील आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात केले होते. त्याला सय्यद यांनी आक्षेप घेतला. रविवारी नगर येथे पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, ‘डॉ. विखे यांचे वक्तव्य मला पटलेले नाही. कारण सुजय डॉक्टर असून सुजाण नागरिक आहेत. ते खासदार असून त्यांच्या घराण्याचे संस्कारसुद्धा त्यांच्यावर आहेत. एक व्यक्ती म्हणून त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. याबाबत त्यांनी माफी मागितली नाही, तर महिला आयोगाकडे मी तक्रार करणार आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मला बहीण मानले व लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे यांनी माझ्याकडे पाठिंबा मागितला होता, त्यांना मी पाठिंबाही दिला होता; मात्र, विखे यांचे ‘साकळाई’चे श्रेय घेण्यासाठी त्यांनी केलेले वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे आहे. विखे यांनी या वक्तव्याबाबत माफी मागणे गरजेचे आहे. अन्यथा, महिला आयोगाकडे तक्रार करावी लागेल’, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्थानिक नेते असेच वागत राहिले तर श्रीगोंदा मतदारसंघातून कृती समितीचा उमेदवार उभा करीन, असेही सय्यद यांनी सांगितले.