
पंढरपूर : शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईवरून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्यात वादंग पेटले आहे. संभाजीराजेंच्या नाराजीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती, त्यावरून खासदार संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
संभाजीराजे म्हणाले की, रायगडावर पुरातत्व खात्याच्या सूचनेने चुकीच्या पद्धतीने विद्युत रोषणाई केली आहे. माझा पुरातत्व खात्यावर आक्षेप होता. यामुळे काळा दिवस हा शब्द पुरातत्व खात्यासाठी उद्देशून बोललो होतो. मी पुरातत्व खात्याला धारेवर धरले. परंतू खासदार श्रीकांत शिंदे यांनी चुकीचा अर्थ घेऊन माझ्यावर टीका केली आहे. मला राजकीय टॅग लावलेले चालणार नाही असं त्यांनी बजावले .
तसेच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ती बद्दल कोणी मला शिकवू नये. मला किल्ले रायगड वरून राजकीय बोट दाखवले तर सहन होणार नाही. माझ्यावर कोणी राजकीय टीका केली तर गाठ माझ्याशी आहे. परंतु सामान्य नागरिकांचा गैरसमज होऊ नये यासाठी मी स्पष्टीकरण दिले असल्याचं खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला