खासदार नवनीत राणा २५ श्रेष्ठ खासदारांच्या यादीत

Navneet Rana

नवी दिल्ली : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) यांचा २५ श्रेष्ठ खासदारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या २५ महिलांची यादी फेम इंडिया आणि आशिया पोस्टने जाहीर केली आहे. भारतात हे सर्वेक्षण महिला सबलीकरण, सामाजिक स्थिती, संसदेतील उपस्थिती आणि सहभाग अशा विविध १० निकषांवर करण्यात आले होते.

नवनीत राणा १८ महिन्यांपूर्वीच खासदार झाल्या आहेत. या कालावधीत संसदेत झालेल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये त्या हजर होत्या. महिलांसह महाराष्ट्राचे मुद्दे मांडणाऱ्या महाराष्ट्राच्या खासदारांमध्ये नवनीत राणा आघाडीवर असतात. महाराष्ट्रातील महिला खासदारांत लोकसभेत सुप्रिया सुळे आणि नवनीत राणा आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतात. नवनीत राणा २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आल्या. त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. तरीही, नवनीत राणा यांनी लोकसभेत अनेकदा महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भूमिका घेतली आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुकही केले आहे. त्यामुळे त्या अनेकदा वादातही सापडतात. नवनीत राणा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. मुंबईत राहणाऱ्या नवनीत राणा लग्नानंतर पती रवी राणा यांच्यासोबत अमरावतीत राहात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER