खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

MP Jaisiddheshwar Shivacharya's pre-arrest bail plea rejected

सोलापूर : सोलापूर सत्र न्यायालयाने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जयसिद्धेश्वर यांच्यावर सोलापूर पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४६७,४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिद्धेश्वर स्वामी सोमवारी उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी १५ फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले १२ अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तसेच तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ . जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेले बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्यामुळे जयसिद्धेश्वर यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

जयसिद्धेश्वर यांच्यावर लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अक्कलकोट येथील नायब तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप पक्षाचे खासदार आहेत. जयसिद्धेश्वर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता.