एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याच्या हालचाली

Uddhav Thackeray And Eknath Shinde

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन खात्यांचा कार्यभार असलेले नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास खात्याचे विभाजन करून त्यांचे एकप्रकारे पंख छाटण्याच्या कामाला वेग आला आहे. नगर विकास खाते- ३ हे नवीन खाते तयार करण्याची तयारी ठाकरे सरकारने केली असून या खात्यात राज्यातील सर्व प्रकल्प म्हणजे मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, सिडको अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असेल आणि विशेष म्हणजे हे खाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत राहील. याबाबतचा अध्यादेशही निघण्याची शक्यता आहे.

मागील चार दिवसांपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे सुरुवातीला  गृह खाते देण्यात आले. त्यानंतर हे गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले. आता नगर विकास खात्यातील प्रकल्पही एकनाथ शिंदेंच्या अधिकाराबाहेर जाणे हा त्यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ सार्वजनिक बांधकाम खाते (सार्वजनिक उपक्रम) राहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या हालचालींमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहेत.

स्वतः पुढाकार घेऊन एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रिपदाच्या वाटपात नक्षलप्रभावित गडचिरोलीचे पालकमंत्रिपद मागून घेतले. पक्षातही संघटन बांधणीत त्यांनी मोठी कामगिरी केली. विशेष म्हणजे सत्तास्थापन होण्याआधी शिवसेनेच्या आमदारांची एकत्र मोट बांधण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका होती. त्यामुळे यानंतरही होत असलेल्या या हालचालींमुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे.