करुणेचा झरा

करुणेचा झरा

आपल्या प्राचीन परंपरेत आपली संत मंडळी आणि आपले पूर्वज ह्यांची ह्रदये कायमस्वरूपी करुणेने ओतप्रोत असल्याचे अनेक दाखले मिळतात. संत मंडळींचा सर्व प्राणिमात्रां बाबत असलेला कळवळा, आणि आपल्या पूर्वजांची गोरगरिबांसाठी दानधर्म करण्याची प्रवृत्ती बघितली की करुणा ही आपल्या खरतर रक्तातच आहे असं वाटतं.

आजकाल मात्र सगळ्यांची आजच्या पिढी बाबत तक्रार असते, की मुले खूप असंवेदनशील होत आहे .एक विचित्र कोरडेपणा त्यांच्यात येतो आहे .आजच्या हिंसात्मक घटनांमधील वाढ व विघातक कृत्य याचेच प्रत्यंतर घडवतात. या बाबतीत बहुतेक पालकांची हीच तक्रार आहे की ही मुले कायम हाणामारीची कार्टून्स बघतात. टीव्हीवरचे भयपट,थ्रिलर बघतात. त्याचा मुलांवर खूप प्रभाव पडतो. आजच्या मुलांना श्यामची आई हा सिनेमा कधीकधी बोअर वाटतो. कारण की त्यात नायक हाणामारी करतच नाही. समाजाच्या संरक्षणासाठी कृष्णाने केलेली कालिया ची हत्या हे शौर्य आहे पण आजच्या हिरोनी प्रेमात काही अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यास केलेल्या हत्या किंवा प्रेयसीचा नकार पचवू न शकल्याने केलेले हल्ले, हेच ज्यांच्या समोर आहेत त्या मुलांना श्यामची संवेदनशिलता कळणार कशी ?

याबाबत मानसशास्त्र काय सांगत? भयपट कार्टून्स चा प्रभाव असला तरी मानसशास्त्र आणखीन एक महत्त्वाचं कारण सांगते. संवेदना बोथट होणाऱ्या वातावरणात मुलं वाढतात .शाळेची शिस्ती चा बडगा असतोच. पण संवेदना ,करुणा जागवणाऱ्या घटना ,आजूबाजूला मुळीच दिसत नाहीत .आई-वडील आपल्या कामात इतके व्यग्र असतात की त्यांना स्वतःला आपल्या पलीकडचे सुखदुःख ,वा इतरत्र काहीही बघायला वेळ नसतो.आपापसातील त्यांची वागणूकही इतकी ताणाची असते की त्यांचे आपापसातले संघर्ष बघून मुले घाबरतात. धांदरटासारखे करायला लागतात. चुका करतात त्यात त्यांना मार मिळतो लहानपणी पण मला झाल्याने पालक कोरडे आणि आता मुले ही आपोआप संवेदनशील हरवलेली अशी दिसू लागली आहेत.

संवेदनशीलता म्हणजे काय ? आपण मागे बघितल्याप्रमाणे भावनांची ओळख होत गेली की सभोवतालच्या व्यक्तींची सुखदुःखे न सांगता आपल्याला कळू लागतात . प्रसंगी आपले सुख दुःख बाजूला ठेवून दुसर्‍याच्या सुख-दुःखात समरस होणे म्हणजे सहानुभूती ! त्याजागी स्वतःला कल्पून विचार करणे म्हणजे तदनुभुती होऊ शकते.

आपोआपच आपल्याला दुसऱ्याचं दुःख पाहिल्यावर ते दुःख दूर करावं वाटतं .म्हणजे मनात करूणा उमटणं. असे आपल्याला म्हणता येईल. बरेच लोक आम्ही खूप तटस्थ राहू शकतो असं म्हणतात, साक्षी भावाने राहणे आणि अति संवेदनशीलतेने वाहवत जाणे यात फरक आहे .ुलांच्या बाबतीत अकारण त्यांच्यात न गुंतणे म्हणजे त्यांना वार्‍यावर सोडणे असा अर्थ नाही .उलट प्रेमाचा भरभक्कम आधार देणं आवश्यक असतं .फक्त प्रेमाचा आधार सोन्याचा पिंजरा किंवा पाश बनायला नको . त्यांच्या प्रगतीच्या आड यायला नको हे मात्र खरे.

जेव्हा माझ्या मुलाला मी शिक्षणासाठी १० वीपासून दूर ठेवलं , त्यावेळी बरेच वेळा मला अनेकांनी ऐकवलं, की तू त्याला फारच लवकर दूर केलं. पण कोणतीही आई मुलाला दूर करण्यास उत्सुक नसते .अति संवेदनशीलतेने वाहवत न जाता बरेचदा त्यांच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचं वाटतं. आणि आज त्याचे सकारात्मक रिझल्ट दिसत आहे. थोडे मोठे झाल्यावर त्यांना दुरून दिलेला मोरल सपोर्ट खूप आवश्यक असतो. मुलं खरंच सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात फक्त त्यांना पाठीवर लढ म्हणणारी शाबासकीची थाप हवी असते.

बरीच लोक नाटक सिनेमा पाहतांना त्यातील क्रौर्याने खूप हळहळतात. त्यांना रडू येतो पण प्रत्यक्ष व्यवहारात ते रुक्ष व्यवहार करतात. घरच्या काम करणाऱ्यांकडून काम करून घेताना त्यांच्या गैरसो यीकडे पूर्णपणे डोळेझाक करणे, मोठ्यांची सेवा ,शेजारधर्म निभावताना आपली दैनंदिन कर्तव्य पार पाडताना मात्र त्यांची संवेदनशीलता पूर्णपणे हरवलेली असते.

आणि मग अशा घरांमधून वाढणारे मूल हे अशी रोल मॉडेल बघतच लहानाचं मोठं होतं आणि त्याच आपोआप कंडिशनिंग होतं , इतरांची पर्वा न करता ,दुःखात सहभागी न होता ,आपण बरे आपले काम बरे ,आयुष्य बरे यातच गुंतून राहणे योग्य आहे. आणि समाज मान्यही आहे असं समजू लागतात.

खरं बघता मानवी करुणा हीच अनेक साहित्य आणि सिनेमाची ऊर्जा आहे. महामारी नंतर आता चित्रपटगृहे खुली झाली आहेत. तशी आता चित्रपटनिर्माते, पटकथालेखक, कलाकारही कामाला सुरुवात करून आपले चित्रपट आणत आहेत..
मध्यंतरी एका चित्रपट समीक्षकांचा लेख वाचनात आला. त्यांनी या गोष्टीचा बराच विस्तृत विचार केलेला आहे. नुकतीच कबीर खान दिग्दर्शित रणवीर सिंग अभिनित “८३” च्या प्रदर्शनाची योजना तयार आहे कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय टीमने एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये विश्वकप जिंकला होता .त्यावर हा चित्रपट आधारित आहे .काही दिवसांपूर्वी कपिलदेव आजारी असल्याची बातमी होती उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांनी ६१ वाढदिवस साजरा केला. त्यावेळी भारतीय खेळाडू आयपीएलच्या गोंधळात व्यग्र होते.

त्याची एक आठवण म्हणजे कपिल देव यांच्या सुरुवातीच्या काळात अभिनेता प्राण यांनी कपिल देव यांचा एम आर एफ ट्रेनिंग ला जाण्याचा खर्च केला होता. त्यांच्याकडे कपिलदेवने मदत मागितली पण नव्हती पण त्यांनी तो स्वतःहून केला होता. कपिलदेव यांनी या काळात आउत्स्विंग चेंडू टाकण्याचा सराव केला. आणि त्यामुळे ते जिंकत राहिले. रवींद्रनाथ टागोर यांच्या काबुलीवाला कथेवर हिंदीत” काबुलीवाला “हा चित्रपट झाला यांनी अभिनय केला यातील कथा अशी की अफगाणिस्तानातून आलेला पठाण एका मुलीत आपल्या मुलीची प्रतिमा पाहतो. आणि तिला काजू बदाम पिस्ते भेट देतो. त्याची गुन्ह्यांमध्ये फसवणूक केलेली असते .सुटका झाल्यावर तो त्या मुलीला भेटायला जातो. त्या वेळेला ती मोठी झालेली असते .तिचा विवाह सुरू असतो. त्या मुलीला तिचे वडील आठवण करून देतात की लहानपणी हे पठाण तिचे खूप लाड करत. चित्रपट निर्माते रमेश तलवार यांनी पुढील कथा काल्पनिक रचली आहे की ती मुलगी डॉक्टर आहे. तिला नोकरीची चांगली संधी येते पण त्याचवेळी अफगाणिस्थान मध्ये युद्ध सुरू झालेले आहे अशी बातमी येते. त्यामुळे अफगाणिस्तानला जायला ती तयार होते. तिला आशा असते की काबुलीवाल्याच्या कुटुंबातील जखमी लोकांची सेवा करण्याची तिला संधी मिळेल.

मानवी या करुणा दगडांना भेदूनही प्रवाहित होत असते. कुठलीही हुकूमशाही किंवा विषम परिस्थितीही याला रोखू शकत नाही .विज्ञान फॅन्टसी ही याच ऊर्जेने प्रभावित असते. दुसऱ्या जगातून आलेल्या प्राण्याच्या डोळ्यातही पृथ्वीवरून परत जातांना अश्रू असतात. याचे संदर्भ “पीके व क्रिश” हे चित्रपट आहेत.

ही करुणा अनेक पालक आपल्या वागणुकीतून जाणीवपूर्वक मुलांपर्यंत पोहोचवतात. किंवा त्यांचं वागणं करुणामय असतं. माझ्या ओळखीची एक मैत्रीण तिच्या मुलांचे कपडे छोट्या झाले की लगेच उचलून धुऊन इस्त्री करून एका बॅगमध्ये ठेवते. गावाकडे जाताना ती बॅग घेऊन जाते आणि तेथील लहान मुलांना ते कपडे वाटते.
आमच्या छोट्या मुलाचा वाढदिवस साजरा करताना,३/४ वर्षाचा असताना अनाथालयातील मुलांसाठी स्वेटर टोप्या आणि झबली ,त्याबरोबरच गोड-

धोड असे त्यांच्यासाठी घेऊन गेलो होतो, त्यांच्याबरोबर खेळलो, मांडीवर घेतले, येताना ती मुले खूप चिटकत होती. पदर धरून ठेवत होती. खूप वेगळा होता तो अनुभव !

बरेच जण गाडीमध्ये बिस्कीटचे छोटे पुडे ठेवतात .सिग्नल वर लहान बाळांना घेऊन येणाऱ्यांना ते देतात. नैसर्गिक आपत्ती जेव्हा-जेव्हा येतात. त्या त्या वेळी धावून जाणारे लोकही आहेत.कामाची मावशी आजारी असताना, तिला स्वतःहून दोन दिवस सुट्ट्या देणे, सकाळ पासून निघालेली असते म्हणून आली की नाश्ता देणे. शेजाऱ्यांच्या अडीअडचणींना धावून जाणे अशा गोष्टी डोळ्यांना दिसत असतील तर करुणा मनामनातून वाहू लागेल.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER