आई आणि बहिणीच्या निर्घृण हत्येप्रकरणी १५ वर्षीय मुलगा अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीजवळी ग्रेटर नोएडामध्ये १५ वर्षाच्या मुलाने आपल्या आईची आणि बहिणीची निर्घृण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला वारासणीतून अटक केली आहे. दरम्यान, मुलानं आपणच दोघींची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबरला टाइल्स व्यापारी सौम्य अग्रवाल यांची पत्नी अंजली आणि त्यांची ११ वर्षाची मुलगी मणिकर्णिका यांची चाकू आणि क्रिकेट बॅटनं हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांच्याच मुलाने रागाच्या भरात हा हत्याकांड केला असल्याचे समोर आले.

अंजली अग्रवाल यांनी आपल्या मुलाला अभ्यासासाठी फटकारले होते. तसेच, अंजलीने तिच्या मुलाला दोन फटकेही लगावले होते. या गोष्टीचा राग या मुलाच्या मनात राहिला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्याने आईवर क्रिकेट बॅटने वार केले. त्याचवेळी त्याची ११ वर्षांची बहिण झोपेतून उठली असे त्याला वाटले त्यामुळे या मुलाने तिच्यावरही वार केले. तसेच धारदार कात्री आणि पिझ्झा कटरनेही आई आणि बहिणीवर वार केले. या सगळ्या हल्ल्यात या दोघींचा जागीच मृत्यू झाला.

आई आणि बहिणीची हत्या केल्यानंतर हा मुलगा वाराणसीच्या दिशेने निघून गेला होता. तिथूनच त्याला अटक करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला तेव्हा त्यांना पहिला संशय या मुलावरच आला. तपासादरम्यान पोलिसांना बाथरुममध्ये रक्तानं माखलेले मुलाचे कपडे मिळाले होते. त्यानंतर तो सोसायटीमधून बाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा रात्री ११.१५ च्या सुमारास बाहेर पडला. टॅक्सीने तो दिल्ली स्टेशनला गेला. तिथून त्याने लुधियानाला जाणारी ट्रेन पकडली. लुधियाना येथून दुसऱ्या ट्रेनने चंदीगढ आणि मग तिथून बसने शिमला या ठिकाणी गेला. शिमला या ठिकाणी थोडावेळ फिरला आणि बसने पुन्हा चंदीगढला आला. तिथून रांची आणि मग दिल्लीला येणाऱ्या ट्रेनमध्ये तो बसला त्यातून कोणा प्रवाशाचा मोबाईल घेऊन त्याने त्याच्या वडिलांना फोन केला. त्यांनतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता या अल्पवयीन मुलानं आपला गुन्हा कबूल केला आहे.