‘आई मुलाशी लैंगिक चाळे करेल ही कल्पनाही अविश्वसनीय’

Kerala High Court
  • महिलेस जामीन देताना हायकोर्टाचा अभिप्राय

एर्णाकुलम : ‘जन्माच्या आधीपासून माता ज्या मुलाला आपल्या उदरात वाढविते तिच त्या मुलाशी लैंगिक चाळे करू शकेल ही कल्पनाही अविशवसनीय आहे’, असे नमूद करत अशा आरोपावरून अटक झालेल्या एका महिलेला केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) जामीन मंजूर केला.

न्या. श्रीमती शिरसी व्ही. यांनी केवळ या महिलेलाच जामीन न देता, कोणीही काहीही फिर्याद नोंदविली म्हणून सरळ गुन्हा नोंदवून अटक न करता पोलिसांनी विवेकबुद्धी वापरून फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपाच्या विश्वासार्हतेची तरी निदान शहानिशा करावी, असा सरसकट आदेशही त्यांनी दिला.

या आरोपावरून ज्या महिलेला अटक झाली होती त्या महिलेला चार मुले असून पती तिला सोडून देऊन त्यापैकी तीन मुलांसह शारजा येथे राहतो. त्याच्यासोबत राहणार्‍या एका मुलाच्या संदर्भातच या महिलेविरुद्ध फिर्याद नोंदविली गेली व त्यात तिला अटक झाली होती. फिर्यादीतील आरोप थोडक्यात असा होता: हा मुलगा १० वर्षांचा असतानापासून ते १३ वर्षांचा होईपर्यंत ही आई त्याला विवस्त्र करून त्याचे गुप्तांग हाताळत बसायची व त्याला स्वत:च्या उघड्या शरिराचे मुके घ्यायला लावायची!

न्यायमूर्तींनी नमूद केले की, सर्वसाधारणपणे जामिनाचा विचार करताना आरोप आणि तपास यांचा खोलात शिरून विचार केला जात नाही व त्याची गरजही नसेत. पण या प्रकरणात आरोपीवर केले गेलेले आरोपच एवढे धक्कादायक, असामान्य आणि अविश्वसनीय आहेत की, निदान स्वत:चा अविश्वास दूर करण्यासाठी तरी त्यांची विश्वासार्हता तपासणे गरजेचे वाटते. खास करून आरोप करणार्‍या मुलाने आधी पलिसांकडे, नंतर बाल हक्क आयोगाकडे, डॉक्टरांकडे व नंतर दंडाधिकार्‍यांपूढे माहिती देताना आपल्या म्हणण्यात कसाकसा बदल केला हे पाहता तर या आरोपाविषयी अविश्वसनीयता अधिकच वाढते.

न्यायालयाने पुढे असे म्हटले की, माता आापल्या अपत्याला नऊ महिने आपल्या उदरात वाढवत असते त्यामुळे आई आणि मुलाचे नाते त्या मुलाच्या जन्माच्या बºयाच आधीपासून तयार झालेले असते. मातेचे आपल्या अपत्यावर जे निर्व्याज प्रेम असते त्याची तुलना जगातील अन्य कोणत्याही प्रेमाशी होऊ शकणार नाही. कोणीही माता आपल्याच मुलाशी असे वर्तन कधी करू शकेल याची कल्पनाही कली जाऊ शकत नाही.

आपल्या पतीने आपल्याला घरातून हाकलून दिले, चारपैकी तीन मुलांन फसवणुकीने आपल्यापासून हिरावले आणि आपल्या व आपल्यासोबत राहणाºया मुलाच्या निर्वाहभत्त्यासाठी आपण पतीविरुद्ध कोर्टात प्रकरण दाखल केल्यावर पतीने त्याच्यासोबत राहणार्‍या मुलाकरवी आपल्याविरुद्ध ही अर्वाच्य फिर्याद दाखल केली, या  त्या महिलेच्या प्रतिपादनाचाही न्यायालयाने तिला जामीन देताना विचार केला.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER