आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल : सुनील छेत्री दुसऱ्या क्रमांकावर

sunil chhetri - Maharashtra Today
  • भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने बांगलादेशवर २ गोल केलेत. त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये

आतापर्यंत ७४ गोल केले आहेत. सर्वाधिक गोल करण्याऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. सुनीलने अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे.

भारताने सोमवारी २०२२ फिफा वर्ल्डकप आणि २०२३ आशिया चषक स्पर्धेच्या संयुक्त पात्रता फेरीच्या सामन्यात बांगलादेशवर २-० अशी मात केली. फिफा वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत हा भारताचा सहा वर्षांत पहिला विजय आहे. भारताचे दोन्ही गोल ३६ वर्षीय छेत्रीने केले. बांगलादेशविरुद्ध केलेल्या दोन गोलमुळे छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपली गोलसंख्या ७४ वर नेली.

रोनाल्डो आघाडीवर

या कामगिरीसह छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले. या यादीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डो अव्वल स्थानी असून त्याने आतापर्यंत १०३ गोल केले आहेत. छेत्रीने (७४ गोल) आता दुसरे स्थान पटकावले असून युएईचा अली माबखोत (७३ गोल) तिसऱ्या स्थानी आहे. मेस्सीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत ७२ गोल केले असून त्याने मागील शनिवारी चिलीविरुद्धच्या वर्ल्डकप पात्रता स्पर्धेच्या सामन्यात गोल केला होता.

आघाडीच्या दहाची बरोबरी करण्यासाठी पाहिजे एक गोल

आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या आघाडीच्या १० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी छेत्रीला केवळ आणखी एका गोलची गरज आहे. हंगेरीचा सँडोर कॉक्सीस, जपानचा कुनिशिगे कामामोटो आणि कुवेतचा बशर अब्दुलाह हे माजी खेळाडू संयुक्तरित्या दहाव्या स्थानावर असून त्यांच्या नावे प्रत्येकी ७५ गोल आहेत.

किरण रिजुजीनी केले अभिनंदन

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये गोल करण्याच्याबाबतीत दुसरे स्थान पटकवल्याबद्दल केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजूजी यांनी ट्विट करून सुनीलचे अभिनंदन केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button