जाणून घ्या, 2020 च्या क्रिकेटमधील सर्वात विचित्र घटना कोणती होती?

Kevin Kasuza - Kusal Mendis

2020 आता इतिहासाचे पान झाले आहे पण येते काही दिवस 2020चीच चर्चा होत राहिल. तर या मावळलेल्या वर्षात क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात विचित्र घटना कोणती असेल? आता ही घटना आहे, विक्रम नाही त्यामुळे ती कालांतराने शोधूनही सापडणार नाही पण ही विचित्र घटना काय होती हे समजेल तेंव्हा तुम्हाला हसावे की रडावे असा प्रश्न नक्कीच पडेल.

तर या विचित्र घटनेचा नायक आहे झिम्बाब्वेचा (Zimbabwe) क्रिकेटपटू केव्हिन कासुझा (Kevin Kasuza) आणि खलनायक आहे श्रीलंकेचा कुशाल मेंडीस (Kusal Mendis) . घटना आहे जानेवारी 2020 मधील. श्रीलंका (Sri Lanka) आणि झिम्बाब्वेदरम्यानची कसोटी मालिका सुरु होती आणि केव्हिन कासुझाने पदार्पण केले होते. पण त्याच्या पदार्पणाचा मुहुर्त काय होता कुणास ठाऊक, पण पहिल्या कसोटीत आणि दुसऱ्या कसोटीतही क्षेत्ररक्षण करताना त्याला फलंदाजाच्या फटक्यावर चेंडू जोरात लागला, एवढ्या जोरात की कन्कशनमुळे (Concussion) (डोक्याला जबर मार) त्याला मैदान सोडावे लागले, दुसऱ्यांदा तर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर आणावे लागले. योगायोग म्हणा की आणखी काही, दोन्ही वेळा तो फाॕरवर्ड शाॕर्ट लेगच्याच जागी होता आणि दोन्ही वेळा फटकावणारा फलंदाज कुशाल मेंडीसच होता. म्हणून खलनायक कुशाल!

अविश्वसनीय वाटावी अशी ही घटना पण प्रत्यक्षात घडलेली.

हरारे येथील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 29 जानेवारी 2020 ला त्याला स्ट्रेचरवरच मैदानाबाहेर आणावे लागले आणि कन्कशनमुळे तो सामन्यातून बाद झाला.

झाले काय की रझाच्या गोलंदाजीवर कुशाल मेंडिसने एक चेंडू पूर्ण ताकदीने पूल केला आणि खाडकन चेंडू फाॕरवर्ड शाॕर्ट लेगच्या जागी उभ्या कासुझाच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. तिथून उसळी घेऊन स्क्वेअरलेगकडे उडालेला झेल कार्ल मंबाने घेतला.मेंडीस बाद झाला पण त्याने कासुझालासुध्दा बाद केले कारण हेल्मेटवर चेंडू एवढ्या जोरात आदळला होता की कासुझा जागेवरच वेदनांनी विव्हळत कोसळला होता. स्ट्रेचरवरुन हलवलेल्या कासुझाला कान्कशन असल्याचे दवाखान्यात स्पष्ट झाले आणि त्याला निगराणीखाली ठेवण्यात आले. कन्कशन रिप्लेसमेंट म्हणून त्याच्या जागी टिमीसेन मारुमा खेळला.

योगायोग पहा, पहिल्या कसोटी सामन्यातही अगदी असेच घडले होते. यावेळीसुध्दा गोलंदाज रझाच होता, कुशाल मेंडीसने फटका मारला, त्यावृळीसुध्दा फाॕरवर्ड शाॕर्ट लेगच्या जागी कासुझा उभा होता. चेंडू त्याच्या डोक्यावर लागला. त्यावेळी कासुझाला लगेचच काही त्रास जाणवला नाही पण काही वेळाने त्याला कन्कशन असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याच्या जागी ब्रायन मुद्झींगन्येमा बदली खेळाडू म्हणून खेळला, मात्र काही काळ विश्रांतीनंतर हा खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळू शकतो असा निर्वाळा डाॕक्टरांनी दिला पण दुसऱ्या कसोटीतही पुन्हा तेच घडले.

दोन्ही सामन्यात हे प्रसंग घडण्याआधी कासुझाने अनुक्रमे 63 व 38 धावांच्या खेळी केल्या.

नंतर एका मुलाखतीत या दोन्ही घटनांबद्दल कासुझा म्हणाला की, मी त्यातून आता सावरलोय. व्यवस्थित आहे, पण लोकं काय काय बोलले…काही जण म्हणाले की मी काम सोडून झोपलो होतो की काय, काही म्हणाले की माझं नशिबच खराब आहे पण मला माहित आहे की फाॕरवर्ड शाॕर्ट लेगची जागाच धोकादायक आहे आणि तिथे काहीही होऊ शकतं. मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून त्या जागी क्षेत्ररक्षण करतोय. आधीसुध्दा जवळपास प्रत्येक सामन्यात त्या जागी मार खाल्लाय पण असा गंभीर मार नव्हता..कसोटी सामन्यांतील घटनासुध्दा तशाच होत्या पण कसोटी सामने हे फार मोठे व्यासापीठ असते..कॕमेरे आसतात, थेट प्रक्षेपण होत असते म्हणून त्याचा जास्त गवगवा झाला. दुसऱ्या सामन्यावेळी मला स्ट्रेचरवरुन आणले असले तरी पहिल्या सामन्यावेळचा मार अधिक जोरात आणि अधिक वेदनादायी होता. आता मला त्या जागेची भीती वाटायला लागली आहे म्हणून आता दुसऱ्या जागी मी क्षेत्ररक्षण करेल.

दोन्हीवेळी गोलंदाज रझा आणि फलंदाज मेंडीसच होता.ते काय म्हणाले होते याबद्दल कासुझा सांगतो की, हो, त्यांच्यासह संघातील प्रत्येक जण माझी चौकशी करत होते आणि माझ्या सहकाऱ्यांनी फार चांगले चांगले संदेश पाठवले. मेंडीस तर मला मेडीकल रुममध्येही येऊन भेटला. चेंजिंग रुममध्येही यैऊन तो माझी चौकशी करुन जायचाआणि हाॕटेलातील माझ्या खोलीवरही तो आला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोपे नाही. त्याला फिटनेस पाहिजे, मानसिक व शारीरिक सक्षमता पाहिजे, कौशल्य तर हवेचशिवाय संयम व ध्येयासुध्दा असायाला हवे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER