मॉर्निंग वॉक आणि करोनाचे नियंत्रण…

Coronavirus - Morning Walk - Editorial

Shailendra Paranjapeकरोना नियंत्रणात येइना आणि काय करायचे ते कळेना, अशी राज्य सरकार, सथानिक महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय या सर्वांची अवस्था झालीय. त्यामुळे दर दोन पाच दिवसांनी कुणी ना कुणी मोठा राजकारणी येतो, बैठका लावतो आणि गाड्या घोडे उडवत निघून जातो. त्या त्या वेळी येणाऱ्या आदेशांचं पालन करण्यात यंत्रणा धन्य मानते. पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

रुग्णसंख्या रोजच्या रोज वाढतेय आणि त्याला जबाबदार कोण…तर अर्थातच पुणेकर. कारण ते बेजबाबदार आहेत. ते कसेही खुल्या ठिकाणी फिरतात. ते मास्क घालत नाहीत. ते सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. त्यामुळे ते करोनाचा (Corona) संसर्ग पसरण्यास कारणीभूत आहेत. सबब यापुढे सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना राज्य सरकारचे जन्मदाते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलीय.

राजा बोले, प्रजा हाले या उक्तीप्रमाणे रस्तोरस्ती पोलीस शिपाई कारवाया करू लागले. बरं, हे पवारसाहेब वगैरे बोलतात बंद खोलीतल्या बैठकीत…मग ते दुसऱ्या दिवशी पेपरात छापून येतंय आणि पोलीस सकाळीच कामाला लागतात. आता अनेक पुणेकर बेसावधपणे मॉर्निंग वॉकला निघतात. सकळी चालायचे म्हणजे व्यायाम होतो आणि तो करताना धाप लागणार मग मास्क कसा घालणार…पण नाही बेसावध पुणेकरांनी पेपर अजून वाचलेला नसतो आणि पोलीसमामा तर सकाळीच तयारीने आलेले असतात. मग काय म़र्निंग वॉकच्या बेसावध क्षणी रविवारी सकाळी अनेक जण पकडले गेले. गुन्हेगार ठरले.

काहींनी तोंडाभोवती रुमाल बांधला होता पण पोलिसांनी त्यांना ऐकवले की मास्क घालणेच आवश्यक आहे. त्यामुळे तोंडावरचा गेले चार महिने असलेला रुमाल अचानक कुचकामी ठरला आणि पाचशे रुपये दंडवसुली केली गेली. पेपरमधल्या बातम्यांनुसार दोन दिवसात पोलिसांनी पुण्यात मास्क न घालता फिरणाऱ्या पाच हजारहून अधिक पुणेकरांकडून दंडवसुली केलीय. गेल्या तीन महिन्यात पुण्याच्या ग्रामीण भागातून मास्क न घालता फिरणाऱ्या चाळीस हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय.

परदुःख शीतल, या न्यायाने दंडाच्या या बातम्या वाचून अनेक जण आपण कसे मास्क लावल्याशिवाय बाहेर पडतच नाही, हे सांगू लागलेत. पण मुळात बाहेर पडणे अत्यावश्यक आहे का, हे मात्र अनेकांना सांगता येत नाही. केंद्रीय पथकातल्या सदस्यांच्या निरीक्षणांनुसार पुण्यात बिनमास्कचे फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळलीय. तसंच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही पुण्यात अभावानेच केले जाते.

पंढरपूरमधे रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशासाठी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी हजारो लोक गोळा केले होते. त्यावेळी सर्वच टीव्हीवाल्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे वारंवार दृष्यांसह दाखवून दिले होते पण पंढरपूरमधे ना आंबेडकरांवर गुन्हा दाखल झाला ना विनामास्क विनासोशल डिस्टन्सिंगचे जमलेल्यांविरुद्ध. दुसरीकडे औरंगाबादमधे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे चे कार्यकर्ते परस्परांना भिडले. तेथेही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाला होता.

पण राजकीय नेत्यांविरुद्ध कारवाई केली जात नाही आणि पुणेकरांना मात्र बेसावध क्षणी मॉर्निंग वॉकच्या वेळी गाठून दंड आकारला जातो. त्यांचा दिवस संस्मरणीय केला जातो. त्यामुळे मग पुणेकर कायद्याबद्दल अधिक संवेदनशील होतात. सविनय कायदेभंगाचे नवनवे मार्ग शोधू लागतात.

दरम्यान, शरद पवार तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर येऊन गेलेत, त्यामुळे दोन पाच दिवस ही कारवाई सुरू राहील. त्यानंतर पुन्हा पोलिसांनाही सवय होईल आणि पुणेकरही त्यांच्या नेहमीच्या हक्कांविषयी अधिक जागरूक होतील. करोना यायचा तेव्हाच अटोक्यात येणार आहे. लस येईपर्यंत हे असंच चालायचं बाबा…हे आहे मॉर्निंग वॉकच्या वेळचं तत्त्वज्ञान. त्यामुळे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या रस्तोरस्ती सकाळच्या फिरण्यात सहभागी व्हावं, सारे प्रश्न चुटकीसरशी सुटतील बघा.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER