पाठीत खंजीर खुपसला म्हणूनच पहाटेचा शपथविधी – देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar-Devendra Fadnavis

मुंबई :- राज्याचे विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत बऱ्याच मुद्द्यावर भाष्य केले. २०१९ साली झालेल्या निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ८० तासांच्या चाललेल्या सरकारवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मान्य केलं. तो निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केलं. पण ही चूक होती. आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेला. ते नसतं केलं तर चांगलं झालं असतं, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात सरकार पडलं, त्यावेळी नेमकं काय घडलं, यावर देखील फडणवीसांनी यावेळी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) पहिली मुलाखत देऊन आमचे सर्व पर्याय खुले आहेत असं सांगितलं. तेव्हा आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राजकारणात फार उतरत नाहीत. पण अमित शाह पूर्णवेळ त्या चर्चेत होते. मी इश्वरावर आणि योगावरही विश्वास ठेवतो. कधीतरी योग असा असतो की आपण खूप प्रयत्न करतो. पण फासे नीट पडले नाहीत आणि गेलं सरकार, असं फडणवीस म्हणाले आहेत.

मी म्हणायचो काँग्रेसचा (Congress) इतिहास पाहाता काँग्रेस काहीही झालं तरी महाविकासआघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) येणार नाही. पण ते घडलं. माझं राष्ट्रवादीसोबत जाणं जेवढं चूक होतं, तेवढंच अनैतिक हे सरकार आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

भाजपानं (BJP) त्या काळात नेमकी मेगाभरती का केली होती, याची दोन कारणं स्पष्ट केली आहेत.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मेगाभरतीमुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेल्याबाबत विचारणा केली असता फडणवीसांनी यावर उत्तर देताना मेगाभरतीची दोन प्रमुख कारणं सांगितली. आम्ही लोकं का घेतले? एक तर काही लोकं अशा ठिकाणी घेतले जिथे पक्षाचा विस्तार करण्याची गरज होती आणि तिथे आमची ताकद कमी होती. इतिहास पाहिला तर असेच वेगवेगळ्या पक्षातून लोकं आमच्याकडे आले आहेत. पूर्वी तर काँग्रेसच होता. आपल्याकडे दगड उचलला तरी काँग्रेसचा निघायचा अशी अवस्था होती, असं फडणवीस म्हणाले.

यावेळी दुसरं कारण सांगताना फडणवीसांनी भाजपापेक्षा जास्त लोकं शिवसेनेनं (Shiv Sena) घेतल्याचा दावा केला. “दुसरं कारण म्हणजे आमची आघाडीची चर्चा सुरू होती, तेव्हा आमचं ठरलं होतं की सीटिंग आमदार ज्या पक्षात येईल, त्याला ती जागा मिळेल. ज्या ठिकाणी आमचे लोकं हरले होते आणि दुसऱ्या पक्षाचे सीटिंग आमदार होते, तिथे शिवसेनेनं त्यांना पक्षात घ्यायचा सपाटा लावला. त्यामुळे आमच्यापेक्षा जास्त लोकं शिवसेनेनं घेतले. काही मंडळी आम्ही घेतली नाहीत, तर सेनेत जात होती. त्यातली काही लोकं आज मंत्री देखील आहेत. त्यामुळे आम्ही जर तेव्हा त्यांना घेतलं नसतं, तर ते शिवसेनेत गेले असते. आणि आम्ही ज्या जागांवर ५-१० हजार मतांनी हरलो, तिथे आमच्या हिशोबाने ती सीट शिवसेनेला गेली असती. त्यामुळे काही लोकं पक्षविस्तारासाठी तर काही लोकं जागा वाचवण्यासाठी आम्ही भरती केली, असं फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मनसे-भाजपची मत जुळली तर वेगळा विचार होऊ शकतो, फडणवीसांचे सूचक विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button