लॉकडाऊनमध्ये बॉलिवुडच्या एक डझनपेक्षा जास्त कलाकारांनी घेतली कायमची एक्झिट

Sushant Singh Rajput - Rishi Kapoor - Irfan Khan

2020 हे वर्ष जगातील कोणतीही व्यक्ती आयुष्यात कधीही विसरणार नाही. जर कोणाकडे जादुची कांडी असती तर प्रत्येकाच्या आयुष्यातील 2020 हे वर्ष वजा करता आले असते. पण तसे होणार नाही. या वर्षाने जगभरात मृत्यूचे तांडव पाहिले. फुटपाथवरील गरीबापासून ते पंचतारांकित जीवन जगणाऱ्या अनेकांनी या जगातून कायमची एक्झिट घेतली. आणि याला कारण ठरले ते कोरोना (Corona) नावाचा विषाणू. यात हॉलिवुड आणि बॉलिवुडमधील अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. बॉलिवुडच्या चार-पाच मोठ्या कलाकारांसह मालिकांमध्ये काम करणाऱ्यांनाही कोरोनाने ओढून नेले.

या वर्षी बॉलिवुडमध्ये (Bollywood) सगळ्यात पहिली एक्झिट घेतली ती प्रख्यात संवेदनशील अभिनेता इरफान खानने. केवळ बॉलिवुडच नाही तर हॉलिवुडमध्येही इरफान खानने अभिनयाचा डंका वाजवला होता. हॉलिवुडच्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये इरफानने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर नावाचा भयंकर कॅन्सर त्याला झाला होता. त्यावर मात करण्याचे त्याचे प्रयत्न सुरु होते परंतु 29 एप्रिल रोजी त्याने एक्झिट घेतली. इरफानच्या मृत्यूच्या दुःखात संपूर्ण बॉलिवुड आणि त्याचे प्रशंसक बुडाले होते.

इरफान खानचे निधन होऊन एक दिवसही उलटत नाही तोच पडद्यावरच्या रोमँटिक नायकाने म्हणजेच ऋषी कपूरने एक्झिट घेतली. कपूर खानदानातील या चिंटूने रुपेरी पडद्यावर अनेक अजरामर भूमिका साकारल्या होत्या. ऋषी कपूरही कॅन्सरग्रस्त झाले होते. अमेरिकेत त्यांच्यावर जवळ जवळ एक सव्वा वर्ष उपचार सुरु होते. उपचारानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. मात्र कॅन्सरने त्यांना सोडले नाही आणि 30 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले.

बॉलिवुडमध्ये साजिद-वाजिद ही अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अशी संगीतकाराची जोडी होती. या जोडीने अनेक हिट गाणी दिली. सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटाला संगीत देऊन या जोडीने बॉलिवुडमध्ये प्रवेश केला होता. सलमानसोबत या जोडीचे खूपच जवळचं संबंध होते. पण ही जोडी एक जून रोजी तुटली. साजिद-वाजिद पैकी वाजिद खानचे निधन झाले आणि बॉलिवुड एका चांगल्या संगीतकाराला मुकला.

यानंतर बॉलिवुडला धक्का बसला तो अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने. 14 जून रोजी सुशांत सिंहने घरी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या मृत्यूची चर्चा केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आजही होत आहे. त्याच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी अजूनही सुरु आहे. काही वर्षातच या हरहुन्नरी कलाकाराने बॉलिवुडमध्ये आपली एक वेगळी ओळख तयार केली होती. त्यामुळेच त्याच्या अकस्मात मृत्यूने सगळे हळहळले.

नायक, संगीतकारांना आपल्याकडे बोलावून घेतल्यानंतर देवाने त्याच्या नृत्यांगनांना संगीत शिकवण्यासाठी बॉलिवुडची डांसगुरु प्रख्यात कोरियोग्राफर सरोज खान यांना त्याच्याकडे बोलावून घेतले. 71 वर्षीय सरोज खान यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्या तेथून बऱ्या होऊन घरी आल्या नाहीत. तीन जुलै रोजी त्यांचे हॉस्पिटलमध्ये कार्डियक अरेस्टने निधन झाले.

‘डोंबिवली फास्ट’ चित्रपटामुळे केवळ मराठीच नाही तर बॉलिवुडचीही नजर निशिकांत कामतने स्वतःकडे वळवून घेतली होती. चित्रपट हाच श्वास मानणाऱ्या निशिकांतने बॉलिवुडच्या जॉन अब्राहम, अजय देवगणसोबतही हिट चित्रपट दिले होते. रितेश देशमुखसाठी निशिकांतने ‘लय भारी’ केला जो तिकिट खिडकीवर सुपरहिट झाला होता. निशिकांत हैदराबादला गेला असता आजारी पडला आणि त्या आजारपणातच हैदराबादच्या एका हॉस्पिटमध्ये त्याचे 17 ऑगस्ट रोजी निधन झाले.

टिपिकल मद्रासी आवाजाने अनेक हिंदी गाणी अजरामर करणारे एसपी बालासुब्रमण्यम यांचेही यावर्षी निधन झाले. सलमान खानसाठी अनेक गाणी त्यांनी गायली आणि त्यांची सर्व गाणी हिट झालेली आहेत. अनेक दिवस ते कोरोनाशी झुंजत होते. परंतु 25 सप्टेंबरला त्यांचे निधन झाले.

सत्यजीत रे यांच्या अत्यंत आवडीचा अभिनेता असलेले आणि आपल्या अभिनयाने बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणारे वरिष्ठ अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे 15 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. परंतु कोरोनाबरोबरचे युद्ध ते हारले.

याशिवाय ‘कहानी घर घर की’, ‘ये रिश्ते हैं प्यार के’ आणि ‘भूतू’ मध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेता समीर शर्मानेही याच काळात आत्महत्या केली. ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेत विविध भूमिका साकारणाऱ्या शफीक अंसारी नावाच्या एका अभिनेत्याचेही या काळात निधन झाले. मालिकांमधील यशस्वी अभिनेता आशीष रॉय, मोठ्या पडद्यावरील सहकलाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे विश्वमोहन बडोला यांचेही याच काळात निधन झाले टीव्ही अभिनेता सचिन कुमार याचेही निधन झाले. तर टीव्ही कलाकार मनमीत ग्रेवालने कोरोना काळात काम नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केली.

सलमान खानसह अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करणारा मोहित बघेल, अभिनेता साई गुंडेवार, प्रख्यात गीतकार योगेश गौर यांचेही याच काळात निधन झाले.

असे वर्ष पुन्हा कोणाच्याही आयुष्यात येऊ नये अशी प्रार्थना करीत या सगळ्यांच्या आत्म्याला शांति लाभो. प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या या सगळ्या कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER