महाराष्ट्रातूनही मॉन्सून माघारी फिरला

-17, 18 ऑक्टोबरला राज्यात मेघगर्जनेसह पाऊस

Monsoon

पुणे (प्रतिनिधी) :- उत्तरेकडील राज्यांमधून सुरु झालेला नैऋत्य मौसमी पावसाचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने होऊ लागला आहे. सोमवारी (दि. 14) मॉन्सून उत्तर अरबी समुद्राच्या उर्वरित भागातून, मध्य अरबी समुद्राच्या काही भागातून, गुजरात व मध्य प्रदेशाच्या उर्वरीत भागातून, कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागातून, विदर्भाच्या बहुतांश भागातून, दक्षिण भारताच्या काही भागातून तसेच झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल व सिक्कीमच्या संपूर्ण भागातून मॉन्सून माघारी फिरला आहे. ईशान्य भारताच्या संपूर्ण भागातून तसेच उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागातूनही मॉन्सून परत फिरला आहे.

ही बातमी पण वाचा : प्रचार फेरीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी टाळली वाहतूक कोंडी!

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची रेषा अलिबाग, नांदेड, रामगुंडम, धरमतरी, सुंदरगड, बंगरीपोशी, डायमंड हार्बर अशी आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात परतीच्या मॉन्सूनची बरसात सुरु आहे. येत्या 48 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

17 आणि 18 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात हवामान कोरडे होते.