मोसमी वारे दोन दिवसांत पोहचले केरळमधून महाराष्ट्रात!

Maharashtra Today

पुणे : दोनच दिवसांपूर्वी केरळमध्ये पोहचलेल्या मान्सूनने(Monsoon) विक्रमी वेळेत महाराष्ट्र गाठला. कोकणसह मध्य महाराष्ट्रापर्यंत(Maharashtra) मजल मारली. पुढील चोवीस तासांत पाऊस महाराष्ट्राच्या आणखी काही भागात बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

अंदमान बेटांवर २१ मे रोजी दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती नसल्याने मोसमी वाऱ्यांचा प्रवास काहीसा रखडला होता. मान्सूनची केरळमध्ये प्रवेश करण्याची नियोजित वेळ चुकली होती. मान्सून १ जूनऐवजी ३ जूनला केरळमध्ये आला. त्यामुळे आता मोसमी वारे महाराष्ट्रात कधी पोहोचणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. केरळला पोहोचण्यापूर्वी एक दिवस आधी पोषक स्थितीमुळे मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढला तीन-चार दिवसात, ६ किंवा ७ जूनला मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता.

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोसमी वाऱ्यांनी मोठा पल्ला गाठला. केरळ आणि लक्षद्वीपचा सर्व भाग व्यापला. कर्नाटक किनारपट्टी आणि अंतर्गत भागासह तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही त्यांनी प्रवेश केला होता.

महाराष्ट्राच्या जवळ, उत्तरेकडून मोसमी वारे ४ जूनला कर्नाटकच्या कारवारपर्यंत आले होते. त्यानंतरही त्यांचा प्रवास वेगाने सुरू होता. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजापेक्षाही अधिक वेगाने वाहत मोसमी वारे विक्रमी वेळेत ५ जूनलाच महाराष्ट्रात पोहचले आहेत.

मोसमी वाऱ्यांनी राज्यातील सहा जिल्ह्यांचा भाग व्यापला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्चिाम-मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरपर्यंत मजल मारली. सध्या पुणे जिल्ह्याच्या वेशीवर येऊन ठेपले आहेत.

या सर्व विभागात शनिवारी पावसाची नोंद झाली. पुढील चोवीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मोसमी वारे प्रगती करू शकतात. याच कालावधीत संपूर्ण कर्नाटक आणि तमिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि तेलंगणातील काही भाग ते व्यापणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button