मोनालिसा होणार भिरकिट

Mona Lisa

चला हवा येऊ द्या या शो च्या लेडीज जिंदाबाद या विशेष सिझनमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसणारी मोनालिसा बागल (Mona Lisa Bagel) आता मोठ्या पडद्यावर लवकरच दिसणार आहे. इन्स्टा पेजवर , ‘लवकरच येतेय नव्या भेटीला… भिरकिटच्या सवारीला’ अशी नव्या सिनेमाची उत्सुकता वाढवणारी सरप्राईज पोस्ट केली आहे. टोटल हुबलाक या मालिकेमध्ये अभिनेता किरण गायकवाड याच्या सोबत लोकांना गंडा घालणार्‍या बबली च्या भूमिकेत मोनालिसाने बाजी मारली होती. ही मालिका जरी फार तग धरू शकली नाही तरी मोनालिसाच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. त्यानंतर मोनालिसा चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद स्पेशल सीझनमध्ये दिसणार असल्याचे तिच्या चाहत्यांना समजल्यानंतर तिचा विनोदी अंदाज पाहण्यासाठी तिचे चाहते देखील उत्सुक होते.

नवरात्र काळात अनेक अभिनेत्रींनी वेगवेगळ्या रंगांमध्ये तसेच सध्याच्या कोरोना योद्धांना सलाम करत समाजातील डॉक्टर, स्वच्छता सेवक, पोलीस यांच्या लूकमधील फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये मोनालिसाने देखील नऊ रंगांमध्ये सामाजिक संदेश देत तिचे फोटो पोस्ट केले होते. तिच्या फोटोची चर्चादेखील सोशल मीडियामध्ये झाली होती.

प्रेम संकट या सिनेमातून मोनालिसाचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले. मुळशी लोणावळ्याचे असलेली मोनालीसा अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आली आणि त्यानंतर एकांकिका नाटक मालिका आणि सिनेमा असा तिचा प्रवास सुरु आहे. मोनालिसाला इंडस्ट्रीमध्ये छोटी सई ताम्हणकर असंही ओळखले जाते. झाला बोभाटा, ड्रायडे या सिनेमातही मोनालिसा दिसली होती. विशेष म्हणजे मोनालिसाच्या आजवरच्या सिनेमांची नावं नेहमीच हटके असतात आणि याच पंक्तीत भिरकीट हे वेगळेच नाव असलेला सिनेमा ती करत आहे. सच्चा लव मूमकीन है…स्वागत तो करो असे म्हणत तिने नव्या सिनेमाची वनलाईन स्टोरी शेअर केली आहे.

सध्यातरी या सिनेमाबद्दल फार काही सांगू शकत नसली तरी त्यानिमित्ताने मोनालिसाचा अभिनय बरेच दिवसांनी मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

अनुप जगदाळे लिखित आणि दिग्दर्शित ‘भिरकिट’ हा मोनालिसा बागलचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून तिच्या चाहत्यांनी तिचं दणक्यात स्वागत आणि कौतुक केलं आहे आणि तिच्या या नव्या सिनेमासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. आणखी एक सरप्राईज यातून मिळाले आहे ते म्हणजे ‘सैराट’ फेम तानाजी गालगुंडे. तानाजी देखील या सिनेमाचा भाग आहे आणि या सिनेमाच्या निमित्ताने तानाजी आणि मोनालिसा पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. ‘भिरकिट’चे मोशन पोस्टर पाहता ते सर्वांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यास नक्की यशस्वी होईल असा विश्वास वाटतो. उडणारा धुरळा, स्कूटर, हाती कलश, हवेत उडणारी ओढणी, मोनालिसाच्या चेह-यावरील स्मित हास्य, सोबतीला तानाजी आणि बॅकग्राऊंडला जबरदस्त म्युझिक या सर्व गोष्टी कमालीची उत्सुकता वाढवत आहेत. पण सर्व काही अजूनही गुलदस्त्यात असल्यामुळे मोनालिसाकडूनच या सिनेमाची पुढील माहिती कधी मिळते याची प्रतिक्षा करावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER