आपसात भांडल्यानं दोघांचंही नुकसान होतं तरीही… – सरसंघचालक

Mohan Bhagwat

नागपूरः “आपसात भांडल्यानं दोघांचंही नुकसान होतं, हे माहिती असूनही काही जण भांडतात. सर्वांना माहिती आहे की, स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे. मात्र, आपल्या स्वार्थाला खूप कमी जण सोडतात. देशाचे किंवा व्यक्तींचे उदाहरण घ्या. माणसाला हेदेखील माहिती आहे की, निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही नाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही.” अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजप – शिवसेनेला खडे बोल सुनावले असल्याचे दिसते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप व शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांत मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यांवरून एकमत न झाल्याने, जनतेने कौल दिल्यानंतरही राज्यात महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. परिणामी सध्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू आहे. या पार्श्वभूमीवर सर सरसंघचालक भागवतांनी भाजप – शिवसेनेला टोचणारे ट्विट केले आहे. या ट्विटमधून सरसंघचालकांनी दोन्ही पक्षांना खोचक सल्लावजा कान टोचण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. राज्यात भाजप – शिवसेना युतीत वितुष्ट आल्यानंतर शिवसेना कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या सोबतीने सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

मात्र, त्या प्रयत्नांना अद्यापही यश येईल असे दिसत नाही. रोज बैठका आणि चर्चांमध्येच महाशिवआघाडी अडकलेली आहे. त्यामुळे अखेर सरसंघचालकांनी युतीपक्ष भाजप-सेनेलाच खडेबोल सुनावल्याचे लक्षात येत आहे. दरम्यान, राज्यात भाजप-सेनेला जनतेने सप्ष्ट कौल दिल्यामुळे युतीचे सरकार केव्हाच स्थापन होणे गरजेचे होते. मात्र निकालानंतर दोन्ही पक्षांत सत्तेच्या वाटाघाटीचा वाद विकोपाला गेल्याने राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागत आहे.

एवढाही वेळकाढूपणा नको की, पुन्हा फिरून फडणवीस आले तर …