धर्मनिरपेक्षतेचं नाव पुढे करुन समाजाला तोडण्याचे पाप करू नका – मोहन भागवत

Mohan Bhagwat

नागपूर : धर्मनिरपेक्षेतेचं नाव पुढे करुन समाज तोडू नका असं आवाहन सरसंघचालक (RSS) मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात केलं आहे. हिंदू राष्ट्र हा शब्द संघ जेव्हा वापरतो तेव्हा त्यामुळे सत्तापिपासूपणा नसतो. त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते तर सर्वसमावेशक अर्थाने हा शब्द संघ वापरत असतो. राजकीय स्वार्थासाठी देश तोडण्याचं काम काही लोक देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेविरोधात करतात. त्यांना ओळखणं खूप आवश्यक आहे असंही मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे. एकमेकांच्या स्वार्थासाठी जे नातं जोडतात ते स्वार्थ संपला की बाजूला होतात. संघाचं नातं तसं नाही संघाचं नातं हे समरसतेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशाच्या वैविध्यतलेला विभाजनाचं नाव दिलं जातं आहे ही बाब चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक सघाच्या दसरा मेळाव्यानिमित्त नागपूर येथे भागवत बोलत होते.

हिंदू शब्दावरुन वाद निर्माण समाजात दुरावा निर्माण करतात. संघाला काही कारण नसताना बदनाम केलं जातं आहे. संघाबाबत कोणत्याही चुकीच्या गोष्टी पसरवण्याच्या आधी संघाची विचारधारा समजून घ्या असंही आवाहन मोहन भागवत यांनी केलं. आपण सगळे भारतमातेचे सुपुत्र आहोत, भारतीयांना आम्ही हिंदू म्हणतो यात गैर काय? आपलं संपूर्ण शरीर एकच आहे त्यामध्ये हात वेगळे आहेत, पाठीचा भाग आणि चेहरा हे ज्याप्रमाणे दिसण्यासाठी समान नसतात पण एकाच शरीराचा भाग असतात अगदी तसेच देशाचे स्वरुप आहे. सगळे शरीर जसं एकच आहे तसाच आपला देशही एकच आहे मात्र काही लोक त्यातला फरक दाखवण्याचा प्रयत्न करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. फुटिरतावादी लोक हे राष्ट्रीय एकात्मतेविरोधात काम करत आहेत. तुकडे तुकडे गँग असंही त्यांना म्हटलं जातं आहे ही गँग देश तोडण्याचं काम करते आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

करोना काळात स्वदेशी हा शब्द चांगलाच प्रचलित झाला. स्वदेशीमधला स्व हेच आमचं हिंदुत्व आहे. स्वामी विवेकानंदांनीही स्वदेशीचा मंत्र दिला होता आम्हीही तेच म्हणतो आहोत. विनोबा भावेंनी स्वदेशी म्हणजे स्वावलंबन हा अर्थ सांगितला आहे आम्हीही ती गोष्ट मानतोच आहोत असंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, पहिल्यांदाच कमी लोकांच्या उपस्थित विजयादशमीचा कार्यक्रम घेण्यात आला. यंदा संपूर्ण जगावर करोनाचं संकट आलं आहे. या संकटकाळात संपूर्ण देश एक झाला. सर्वांनी मिळून करोनासोबत लढा दिला आहे. करोनामुळे रोजगार सोडून गावी गेलेला मजूर परत येत आहे. परतलेल्यांना पुन्हा रोजगार आहेच असं नाही. गरज पडल्यास त्यांना आता नवीन रोजगार शोधावा लागेल.

२०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं शिवाय ९ नोव्हेंबर रोजी न्यायालयानं राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. संपूर्ण देशानं हे निर्णय संयमानं स्वीकारले. याशिवाय सीएएचा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही, असे भागवत म्हणाले.

भागवत यावेळी म्हणाले की, कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाल्याची शंका आहे. पण या काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. चीनने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली असली तरी लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सामरिक आणि आर्थिक बाबींमध्ये चीनला जोरदार धक्का बसला आहे. अन्य देशांनीही चीनला फैलावर घेतलं आहे. चीनचा विस्तारवाद लक्षात घेता तो पुढे काय करेल हे माहीत नाही. त्यामुळे सामरिक, आर्थिक, औद्योगिक बाबींमध्ये आपण सक्षम होणं गरजेचं आहे.

भारताने नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची, मित्रता टिकवण्याची गरज आहे. आपल्यात मतभेद आहे, मतभेद हो होत असतात. ते दूर करुन चीनला टक्कर द्यायची असेल तर शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले ठेवणं गरजेचं आहे. ‘आम्ही मित्रता टिकवतो म्हणून आम्हाला कमजोर समजू नका’, असा इशारा त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER