मोहम्मद शमीच्या दोन डावातील कामगिरीत जमिन-अस्मानाचा फरक

Mohammed Shami

पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात विलक्षण प्रभावी
दुसऱ्या डावात ठरतोय हुकुमी एक्का
दुसऱ्या डावात कसोटी इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा भेदक गोलंदाज

मोहम्मद शमीने तो भारताचा हुकुमी गोलंदाज असल्याचे वारंवार सिध्द केले आहे पण त्यातही कसोटी सामन्यांतील दोन डावांतील त्याच्या कामगिरीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. अगदी हे टोक ते ते टोक अशी त्याची परस्परविरोधी कामगिरी आहे. पहिल्या डावात जिथे त्याची सरासरी ३४.४७ व स्ट्राईक रेट ६०.६ आहे तिथे दुसऱ्या डावात हीच सरासरी २२.५८ एवढी कमी आणि स्ट्राईक रेट ४१.४ असा प्रभावी झाला आहे.

दक्षिण आफ्रिेकेविरुध्दच्या विशाखापट्टमण कसोटीतील विजयातही हेच दिसून आले. या सामन्याच्या पहिल्या डावात जिथे त्याला १८ षटकांच्या गोलंदाजीनंतरही एकसुद्धा बळी मिळाला नाही तिथे दुसऱ्या डावात म्हणजे सामन्यातील चौथ्या व शेवटच्या डावात १०.५ षटकातच त्याने दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला.

भारतातील कसोटी सामन्यांमध्ये शेवटच्या डावात संघांचा डाव गडगडणे ही काही नवीन गोष्ट नाही पण ही घसरगुंडी बहुतेकदा फिरकी गोलंदाजच उडवून देतात. मात्र यावेळी शमीसारख्या जलद गोलंदाजामुळे प्रतिस्पर्ध्यांचा शेवटचा डाव गडगडला हा बदल नोंद घेण्यासारखा आहे. या बदलामुळेच शमी हा दुसऱ्या डावात विराट कोहलीसाठी हुकुमी एक्का ठरत आला आहे.

शमी हा दर्जेदार जलद गोलंदाज आहे याबद्दल शंकाच नाही. २०१८ पासून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २४.९५ च्या सरासरीने बळी मिळवले आहेत. पण या कामगिरीचे पहिला डाव आणि दुसरा डाव अशी विभागणी करून विश्लेषण केले तर अगदी वेगळे चित्र समोर येते.

सोबतच्या आकडेवारीतील सरासरी आणि स्ट्राईकरेट बघा म्हणजे याची खात्री पटेल.

डाव बळी सरासरी स्ट्राईक रेट
पहिला ३६ ३६.१६ ६२.८०
दुसरा ४२ ३३.०२ ५८.७०
तिसरा ४१ २५.३१ ४६.१०
चौथा ३९ १९.७१ ३६.४०

२०१८ पासूनच्या कामगिरीचा विचार केल्यास शमीच्या पहिल्या डावातील (प्रत्यक्ष सामन्यातील पहिला आणि दुसरा डाव) आणि दुसऱ्या डावातील (सामन्यातील तिसरा व चौथा डाव) कामगिरीत हा फरक प्रकर्षाने दिसून येतो.

डाव बळी सरासरी स्ट्राईक रेट
पहिला २३ ३७.५६ ७०.५०
दुसरा ४० १७.७० ३२.१०

हा सरासरीतील फरक (३७.५६ आणि १७.७०) व स्ट्राईक रेटमधील फरक (७०.५० आणि ३२.१०) बघा म्हणजे लक्षात येईल की शमी सामन्यात नंतरच्या डावांमध्ये किती भेदक आणि किती प्रभावी ठरतो.

कसोटी सामन्यांमध्ये सहसा नंतरच्या डावांमध्ये गोलंदाजांची सरासरी बिघडलेली दिसते पण शमीच्या बाबतीत याच्या नेमके उलट घडतेय. शमी दुसºया डावातच नेमका अधिक प्रभावी कसा ठरतो या प्रश्नाचे उत्तर बहुधा त्याने यष्टयांचा रोख धरुन केलेल्या माºयात आहे. त्यामुळे कसोटी सामन्यात नंतरच्या डावांमध्ये खेळपट्टीचा टणकपणा कमी होऊन चेंडू कमी उसळत असला आणि चेंडूचे उसळणे अनिश्चित असले तरी मोहम्मद शमी प्रभावी ठरतो. सामन्याच्या सुरूवातीला टणक व ताज्या खेळपटट्यांवर असे चेंडू खेळून काढणे फलंदाजांसाठी तुलनेने अधिक सोपे असते. मात्र दुसऱ्या डावात चेंडूच्या उसळण्यातील अनिश्चितता फलंदाजांना बुचकळ्यात टाकते.

शमीसारखेच्या दुसऱ्या डावात प्रभावी ठरलेल्या पॅट कमिन्स व मोर्ने मॉर्केल यांच्या गोलंदाजीचेही हेच वैशिष्टय दिसून आले आहे.

कसोटी सामन्याच्या शेवटच्या डावात सर्वोत्तम स्ट्राईक रेट राखणारे गोलंदाज (पात्रता : किमान ३० बळी व स्ट्राईक रेट ४५ च्या कमी)

गोलंदाज बळी स्ट्राईक रेट
अँडी कॅडिक ४० ३०.३
कसिगो रबाडा ३६ ३५.८
मोहम्मद शमी ३९ ३६.४
जे.व्ही. साँडर्स ३२ ३७.१
मोईन अली ५९ ३९.१
रिचर्ड हॅडली ३२ ३९.४
रेयान हॅरिस ३८ ४०.१
व्हर्नन फिलँडर ४४ ४१.३
ह्युज ट्रंबल ४० ४१.७
वकार युनीस ५५ ४२.५
मायकेल होल्डिंग ३३ ४२.७
कर्टली अ‍ॅम्ब्रोज ५८ ४३.४
रंगना हेरथ ११५ ४३.५