मोहम्मद रिझवानचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय शतक

Mohammed Rizwan only second to score hundreds in all 3 formats

पाकिस्तानचा (Pakistan) यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) याने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या टी-20 सामन्यात गुरुवारी नाबाद 104 धावांची खेळी केली आणि आपल्या संघाच्या तीन धावांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद रिझवानचे हे शतक खास ठरले कारण कसोटी सामने आणि वन डे सामन्यानंतर आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतही त्याच्या नावावर शतक लागले आहे.

यासह तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारा तो केवळ दुसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. असा पहिला विक्रमी शतकवीर यष्टीरक्षक न्यूझीलंडचा ब्रेंडन मॕक्क्युलम (Brendon McCullum) होता.

28 वर्षीय रिझवानचे हे शतक म्हणजे पाकिस्तानतर्फे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील केवळ दुसरेच शतक आहे. पहिले शतक अहमद शेहजादच्या नावावर आहे. केवळ 64 चेंडूतच 6 चौकार व 7 षटकारासह रिझवानने नाबाद 104 धावांची ही खेळी केली. एका टी-20 खेळीत सात षटकार लगावणारा तो पहिलाच पाकिस्तानी ठरला. रिझवानच्या नावावर आता कसोटी व टी-20त प्रत्येकी एक आणि वन डे सामन्यांत दोन शतकं आहेत. मॕक्क्युलमच्या नावावर कसोटीत 5, वन डेत 3 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक आहे.

या विक्रमाबद्दल रिझवान म्हणाला की, पाकिस्तानसाठी अशी शतके करणारा पहिलाच यष्टीरक्षक म्हणून आपली नोंद होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. लाहोरच्या या खेळीत माझे लक्ष्य फक्त धावा करण्याचेच होते. शतकाकडे माझे लक्ष नव्हते. 96 व 98 धावांवर जीवदान लाभले. आणि केवळ शतक साजरे करणे एवढेच उद्दीष्ट मी बाळगले नाही.

मोहम्मद रिझवानची शतके

कसोटी- 115 वि. द. आफ्रिका – 2021
वन डे- 115 वि. ऑस्ट्रेलिया – 2019
वन डे- 104 वि. ऑस्ट्रेलिया – 2019
टी-20- 104 वि. द. आफ्रिका- 2021

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER