कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे घसरला मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख

Maharashtra today

नवी दिल्ली :- केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (second wave of corona) नियोजनावरून टीका होते आहे. याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) प्रतिमेलाही बसला. कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आलेल्या अपयशाच्या आरोपांमुळे पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी झाली. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकेतील कंपनीच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’च्या आकडेवारीनुसार मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख ५० टक्क्यांच्या खाली आला आहे.

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी प्रकाशित झाली आहे.

नरेंद्र मोदी अजूनही या १३ देशांच्या राष्टाध्यक्षांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असले तरी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये १ एप्रिल ते ११ मे दरम्यान १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. मोदींची लोकप्रियता म्हणजेच अ‍ॅप्रूवल रेटिंग एक एप्रिलपूर्वी ७३ टक्के एवढी होती. त्यामध्ये ११ मे रोजी १० टक्क्यांची घसरण होऊन ती ६३ वर आली. म्हणजेच मोदींचे अ‍ॅप्रूवल रेटींग एक मे ते ११ मे दरम्यान १० टक्क्यांनी कमी झाले. १० टक्क्यांची वाढ मोदींच्या डिसअ‍ॅप्रूवल रेटिंगमध्ये झाली आहे. २१ टक्क्यांवर एक मे आधी असणारी ही रेटींग ११ मे नंतर ३१ टक्क्यांवर पोहचली आहे.

मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचे केवळ मॉर्निंग कन्सल्टच्या अ‍ॅप्रूवल रेटिंगमध्येच नाही तर भारतीय पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्येही दिसते आहे. २३ राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमधील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेआधी मोदींची लोकप्रियता ५७ टक्क्यांपर्यंत होती. पण ११ मे पर्यंत यामध्ये ९ टक्क्यांची घसरण झाली आणि ती थेट ४८ टक्क्यांवर आली. मोदींची लोकप्रियता पहिल्यांदाच ५० टक्क्यांच्या खाली आली असे या संस्थेने म्हटले आहे.

ओआरमॅक्स मिडियाच्या या सर्वेक्षणामध्येच चीनसोबत झालेला वाद आणि चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर पंतप्रधानांची लोकप्रियता ६९ टक्क्यांपर्यंत गेली होती. पण ही लोकप्रियता २१ टक्क्यांनी कमी होऊन ४८ वर आली आहे. ६९ टक्के लोकप्रियता या सर्वेक्षणातील मोदींची सर्वात चांगली कामगिरी होती.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, यापूर्वी – नोटबंदी, कृषी कायदे, सुधारित नागरिकत्व कायदा यासारखे निर्णय आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळानंतरही मोदींची लोकप्रियता कायम होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका मोदींच्या लोकप्रियतेला बसल्याचे या दोन्ही सर्वेक्षणांमधून उघड झाले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button