भर उन्हात मोदींची बॅटींग

Modi's campaign loksabah elections

Moreshwar Badgeपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पाच वर्षांनंतरही कायम आहे, हे आज पाहायला मिळाले. पूर्वीसारखा जोश नसेल. पण वर्ध्याच्या भर दुपारच्या ४२ अंश उष्णतामानात ५० हजार लोक मोदींना ऐकायला येतात, ही सोपी गोष्ट नाही. एका वृत्तपत्राने अर्धे मैदान रिकामे असल्याचे म्हटले. पण अर्धे भरले हे ते का लपवतात? भर उन्हात एवढे लोक खेचून आणण्याची आज कुण्या राजकीय नेत्याची ताकद आहे? उष्माघाताचा धोका पत्करून लोक सभेला येतात याचा अर्थ मोदींची जादू पाच वर्षांनंतरही कायम आहे. २०१४च्या निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या प्रचाराचा नारळ मोदींनी याचा मैदानात फोडला होता. हे मैदान त्यांच्यासाठी भाग्यवान ठरले. त्यामुळेच मोदींना पुन्हा इथूनच सुरुवात करावीशी वाटली असावी. सत्तेची ऊब हे विलक्षण टॉनिक असते. पण मोदींची ऊर्जा भल्या भल्या नेत्यांना लाजवणारी आहे. ह्या वयात दिवसातून तीन-तीन सभा करणे सोपे नाही. कधीकाळी इंदिरा गांधी यांनाही विदर्भ खुणवायचा. विदर्भात सभा केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्याचे रिझल्टही त्यांना मिळायचे. वर्धा, पवनार, सेवाग्रामचा विसर पडल्याने काँग्रेसवर आज विरोधी बाकांवर बसण्याची पाळी आली आहे.

ही बातमी पण वाचा:- बिग फाईट; अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला 

मोदींची बोलण्याची शैली लोकांना आवडते. त्याचा प्रत्यय वर्ध्याच्या सभेत आला. मोदींनी आपल्या भाषणात दोन्ही काँग्रेसला ठोकून काढले. काँग्रेसमध्ये टीका करण्यासारखे नेतेच राज्यात उरले नसल्याने शरद पवारच साऱ्यांचे टारगेट ठरत आहेत. मोदी बारामतीला शरद पवारांच्या गावी गेले होते. त्या वेळी ‘पवार हे आपले गुरु आहेत. त्यांचे बोट धरून आपण राजकारण शिकलो’ अशा शब्दात त्यांनी पवारांचा गौरव केला होता. मधल्या काळात बरेच पाणी वाहून गेले.

ही बातमी पण वाचा:-  प्रियांकांच्या अंगावर मनेकाला सोडणार 

लोकसभेच्या ह्या निवडणुकीत उभे राहण्याचे पवारांनी योजिले होते. पण पुढे त्यांनी तो विचार गुंडाळून ठेवला. पवारांना वाऱ्याची दिशा अगोदर कळते, असे म्हणतात. चार महिन्यापूर्वी वातावरणही सरकारविरोधी होते. गेल्या महिन्यात वातावरण बदलले. पुलवामा हल्ल्यानंतर तर पाकिस्तानविरोधी लाटेत देशप्रेम हाच निवडणुकीचा मुद्दा बनला. तसल्या हवेत लढून फजिती करून घेणे पवारांना परवडणारे नव्हते. घरातली भांडणे त्यांच्या मदतीला आली. पवारांच्या घरातली यादवी आता वास्तव ठरते आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण शरद पवारांना आपली कन्या सुप्रियाला पहिली महिला मुख्यमंत्री करायचे आहे. मुलाला खासदारकीचे तिकीट नाकारले जाताना पाहताच अजितदादांच्या भावनांचा स्फोट होणे साहजिक आहे. दादा आज उघडपणे बोलत नसले तरी आज ना उद्या ही भांडणे चव्हाट्यावर येणार आहेत. एकमेकांचे पाय ओढण्यात काँग्रेस संपली. राष्ट्रवादीही त्या वाटेवर आहे. पण एक खटकले. वर्ध्याच्या सभेत शेतकरी आत्महत्या या विषयाला जेवढ्या गांभीर्याने घ्यायला हवे होते, ते घेतले गेले नाही. विदर्भात शेतीचे संकट आणि शेतकरी आत्महत्या हाच निवडणुकीचा मुद्दा आहे. गेली कित्येक वर्षे विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. यवतमाळ पाठोपाठ आता वर्ध्यातही हे लोण पोचले आहे. आपल्याकडे राजकारणच सारे मुद्दे खाऊन टाकते.

मोरेश्वर बडगे
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार)