भारताच्या इतिहासात मोदींकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस, एमएसपी सुरूच राहणार

Farmers-Pm modi

नवी दिल्ली : कृषी क्षेत्राशी संबंधित, शेतकरी (Farmers) उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, २०२० आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) दर हमी विधेयक २०२०, ही दोन विधेयके आवाजी मतदानाने आज राज्यसभेत मंजूर करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी प्रतिक्रिया देताना, हा भारतीय कृषी इतिहासातील महत्वाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. तसेच एमएसपी व्यवस्था सुरूच राहील, असे आश्वासनही पंतप्रधान मोदींनी दिले आहे. लोकमतने याबाबत बातमी प्रकाशित केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘भारताच्या कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस मोठा आहे. संसदेत महत्वाचे विधेयक मंजूर झाल्याबद्दल मी आपल्या अन्नदात्यांचे अभिनंदन करतो. यामुळे कृषी क्षेत्रात केवळ अमुलाग्र बदलच होणार नाही, तर यामुळे कोट्यवधी शेतकरी सशक्त होतील.’

मोदी म्हणाले, “कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची तत्काळ आवश्यकता आहे. यामुळे मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. ही विधेयके मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंत पोहोचणे सहज सोपे होईल. यातून केवळ उत्पादनच वाढणार नाही. तर इतरही चांगले परिणाम दिसून येणार आहेत. हे पाऊल स्वागत करण्यासारखे आहे.”

एमएसपीवर बोलताना मोदी म्हणाले, “मी आधीही बोललो आहे आणि पुन्हा एकदा सांगतो एमएसपी व्यवस्था कायम राहील. सरकारी खरेदीही कायम राहिल. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य ते प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे जगणे अधिक सुखकर करू.”

अनेक दशकांपासून आपले शेतकरी बांधव, अनेक प्रकारच्या बंधनांत अडकले होते आणि त्यांना दलालांचा समना करावा लागत होता. आता ही विधेयके संसदेत मंजूर झाल्याने, या सर्वांतून शेतकऱ्यांची मुक्ती झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल आणि त्यांची समृद्धी निश्चित होईल,” असेही मोदी म्हणाले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER