‘मोदीजी, माझ्या बहिणीला न्याय द्या !’ पंडित छन्नूलाल महाराज यांच्या कन्येची विनवणी

Chhannulal Mishra's Daughter - PM Narendra Modi

वाराणसी : उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल (Chhannulal Mishra) यांची मुलगी संगीता हिचे कोरोनाने (Corona) निधन झाले. तिचा मृत्यू रुग्णालयाच्या निष्काळजीमुळे झाला, असा आरोप छन्नूलाल यांच्या कुटुंबीयांनी केला. तिची बहीण नम्रता हिने पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना विनवणी केली की, माझ्या बहिणीला न्याय द्या.

काही दिवसांपूर्वीच छन्नूलाल यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतर गेल्या आठवड्याच मुलगी संगीता हिचेही खाजगी रुग्णालयात निधन झाले. छन्नूलाल यांची दुसरी मुलगी नम्रताने रुग्णालयावर निष्काळजीपणा आणि जास्त पैसे घेतल्याचा आरोप केला. नम्रता यांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली होती. नम्रता ही मोदी यांना हात जोडून – माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या, अशी विनवणी करत असल्याचा हृदय हेलावणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, छन्नू महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत आणि मोदीही महाराजांचा मनापासून आदर करतात. त्यांच्या पाया पडतात. नम्रता यांनी मोदी यांना या संबंधांचा हवाला देऊन म्हटले आहे की, “माझ्या बहिणीसोबत काय झाले आहे मला सांगा. माझ्या बहिणीचा तडफडून मृत्यू झाला आहे. पंतप्रधानजी तुम्ही माझ्या वडिलांच्या पाया पडतात. माझे वडील तुमच्यावर खूप प्रेम करतात. तुम्हाला आशीर्वाद देतात. माझी विनंती आहे की, माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या. माझ्या बहिणीला काय झाले होते, तिच्यावर कोणते उपचार सुरू होते हे आम्हाला सांगा. माझे वडील इथे भांडायला येऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये माझ्या बहिणीचा मृत्यू झाला हे आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. मोदीजी आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.”

पंडित छन्नूलाल यांची पत्नी मनोरमा आणि मुलगी संगीता यांना कोरोना झाला होता. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २६ एप्रिलला पत्नीचे निधन झाल्यानंतर छन्नूलाल यांनी मुलीला पाहण्याची विनंती रुग्णालयाकडे केली होती. मात्र रुग्णालयाने छन्नूलाल यांना संगीताला पाहू दिले नाही. १ मे रोजी संगीताचे निधन झाले. सोमवारी नम्रता यांनी रुग्णालयाला सीसीटीव्हीचे फुटेज दाखवण्याची विनंती केली. रुग्णालयाने याबाबत काहीही प्रतिसाद दिला नाही. रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे माझ्या बहिणीचा मृत्यू झाला, अशी लेखी तक्रार नम्रता यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे गेले. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तीन डॉक्टरांची एक समिती नेमून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button