‘या’ मुद्द्यावर मोदी जेलमध्ये जातील : राहुल गांधी

Modi will go to jail on 'this' issue-Rahul Gandhi

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरून राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चांगलेच रणकंदन सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राफेल मुद्द्यावरून काॅंग्रेसने मोदी सरकारला चांगलेच वेठीस धरल्याचे दिसते. राफेलच्या सखोल चौकशीसाठी राहुल गांधींनी आपली सगळी ताकद पणाला लावली असल्याचे दिसते. यासाठी मोदींना जेलदेखील होऊ शकते, असे काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

‘राफेलप्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाली केली आहे; मध्यस्थाची भूमिका वठवली. ’ असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच राफेलप्रकरणात मोदींनी संरक्षण कराराबाबतची गोपनीयता मोडली आहे, या मुद्द्यावर ते जेलमध्ये जाऊ शकतात, असे राहुल गांधी म्हणाले.

ही बातमी पण वाचा :- मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर बेरोजगारीचा बकासुरच खुश होईल : राष्ट्रवादी 

राफेल करारात मोदी यांनी अनिल अंबानी यांचे मध्यस्थ म्हणून काम केले. मोदी हे भ्रष्टच असून त्यांनी गोपनीयतेचेही उल्लंघन केले आहे. या प्रकरणी त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. मोदींनी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली, असा आरोप त्यांनी केला.

फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेच्या १५ दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने मंगळवारी प्रकाशित केले. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.