मोदींनी दररोज पत्रकारांशी बोलले पाहिजे

badgeकोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. देशभर लॉकडाऊन असूनही दररोज कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचा आजचा आकडा ६४९ वर पोचला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे सव्वाशे लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपुरात आज आणखी एक रुग्ण कोरोनाबाधित मिळाला. मोदी सरकार आणि राज्यातले उद्धव सरकार रात्रंदिवस मेहनत घेत असताना कोरोनाला म्हणावे तसे रोखता आलेले नाही. लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवा आपण सुरू ठेवल्या आहेत. म्हणजे लोक बाहेर पडणार. म्हणजे संसर्ग आलाच. बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिच्यासारखी काही मंडळी लपवालपवी करू पाहात असल्याने काळजी वाढते आहे. कोरोना आणखी पसरू द्यायचा नाही आणि देशबंदीमुळे लोकांना मरूही द्यायचे नाही, अशी दुहेरी सर्कस सरकारला करायची आहे.

कोरोनाबद्दल खूप काही खरीखोटी माहिती सोशल मीडियावर पसरत आहे. त्यामुळे घबराट पसरते. परवाचीच गोष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्हीवर बोलणार म्हटल्यावर लोकांनी खरेदीसाठी दुकानांमध्ये तोबा गर्दी केली. साठा भरपूर आहे, गर्दी करू नका, असे वारंवार सांगूनही गर्दी होते, याचा अर्थ लोकांमध्ये कुठे तरी संभ्रम आहे. अशा वेळी खरी माहिती लोकांपुढे आली पाहिजे. मुख्य म्हणजे सरकारमधील प्रमुख माणसाने ती दिली पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अलीकडे दररोज तासभर पत्रपरिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. इतरही देशांचे प्रमुख पत्रकारांपुढे रोज येत आहेत. देशाचा प्रमुख रोज बोलतो यातून वेगळा संदेश मिळतो. लोकांना लढण्याची हिंमत मिळते. आपल्याकडे मोदी पत्रपरिषद घेत नाहीत, पत्रकारांच्या प्रश्नांना थेट सामोरे जात नाहीत. आतापर्यंत खपून गेले. आताचा प्रसंग वेगळा आहे. मोदींनी रोज पत्रकारांशी बोलले पाहिजे आणि ते लाइव्ह टीव्हीवर दिसले पाहिजे. सुदैवाने कोरोनावर राजकारण होताना दिसत नाही. मोदींनी त्याचा फायदा घेऊन रोज देशापुढे आले पाहिजे.

कोरोनाने केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेवरच संकट आलेले नाही तर वैद्यकीय, सामाजिक… सर्व प्रकारची संकटे उभी झाली आहेत. हातावरच्या रोजच्या कमाईवर जगणाऱ्या कष्टकरी लोकांना जगवण्याचा मोठा प्रश्न आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशातील ८० कोटी गरिबांसाठी मदतीच्या मोठ्या घोषणा केल्या. इथे आभाळ फाटले आहे. ते पाहता ती मदत अपुरी आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा पाचपट मोठी आहे. अमेरिकेने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दोन हजार बिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. आपल्याकडचे संकट पाहता भारताने किमान २० लाख कोटी रुपये मदतीची तयारी ठेवली पाहिजे. आपली घोषणा फक्त १ लाख ७० हजार कोटी रुपयांची आहे. आता बोला. नुसती घोषणा करून होणार नाही. मदत खऱ्या गरजूपर्यंत पोचली पाहिजे. कारण सर्वाधिक तडाखा असंघटित क्षेत्राला बसला आहे. कोरोनाचे धक्के दोन-चार महिने चालतील असा अंदाज आहे. सध्या बळींचा आकडा १० च्या आसपास आहे. पण कोरोना तिसऱ्या टप्प्यात गेला तर हाहाकार माजेल. अर्थव्यवस्था उद्या सावरेलही. पण मेलेली माणसे परत आणता येणार नाहीत. त्यामुळे माणसे वाचवणे हा सरकारचा आतापासूनच मुख्य अजेंडा असला पाहिजे.