मोदींची भेट, 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतीचा पुढील हप्ता जारी केला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत पाठवली जाते. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत जारी करण्यात आली आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी तीन नव्या कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हा कायदा कसा योग्य आहे, त्यात शेतकऱ्यांचे कसे हित दडले आहे. ते सविस्तरपणे समजावून सांगितले. केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीय. तिथलं सरकार राजकीय कारणांमुळे हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीय असं मोदी म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

कृषी सुधारणा कायद्यांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नव्या कायद्यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात. जिथे तुम्हाला चांगला मोबदला मिळेल, तिथे तुम्ही पिकवलेली वस्तू विका”. “तुम्हाला बाजारपेठेत, खरेदीदारांना उत्पादन विकायचे असेल, तर विकू शकता. शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य मिळत असेल तर त्या सुधारणांमध्ये चुकीचे काय आहे?” असा सवाल मोदींनी केला.

“काही लोकांना फक्त खोटी माहिती पसरवण्यामध्ये रस आहे. या कायद्यामुळे बाजारपेठ आणि एसएसपी पद्धत जाईल असे पसरवले जात आहे. पण असे काही घडणार नाही” असे मोदी म्हणाले. “नवे कृषी कायदे शेतकऱ्याला बळ देणारे आहेत. आधी शेतकऱ्यासाठी जोखीम जास्त असायची. पण आता उलटं झालं आहे. शेतकरी अधिक सुरक्षित असेल तर करार करणाऱ्याला किंवा कंपनीची जोखीम जास्त असेल” असे मोदींनी सांगितले.

“शेतकऱ्याला वाटलं तर तो करार रद्द करु शकतो पण करार करणारी कंपनी असा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमच्या सरकारला विरोध करणाऱ्यांबरोबरही आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण तर्क आणि मुद्यांवर चर्चा होईल” असे मोदींनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER